Rajkot Fire News : गुजरातमधील राजकोट शहरातील एका गेम झोनला काल भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३० लोकांचा होरपळून मृत्यू झाला. या मयतांत लहान मुलांचाही समावेश होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आग कशामुळे लागली याची खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. दुर्घटना घडली त्या दिवशी येथे मोठी गर्दी झाली होती. कारण शनिवारचा सुट्टीचा दिवस होता. जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी 99 रुपयांच्या एन्ट्री फीची स्कीम ठेवण्यात आली होती. याचा परिणामही दिसून आला. सुट्टीचा दिवस आणि कमी फी असल्याने गर्दी वाढली होती.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी घटनास्थळाचा दौरा केला. या घटनेचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे. गेम जोनशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारची चौकशी सुरू असून पीडितांना लवकरात लवकर न्याय दिला जाईल असे सांघवी यावेळी म्हणाले. आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळालेली नसली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की काही इलेक्ट्रिक कारणांमुळे आग लागली असावी. या गेमिंग झोनला फायर विभागाची एनओसी नव्हती. या एनओसीसाठी अर्जही केलेला नव्हता अशीही माहिती समोर आली आहे.
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं
आता जी काही माहिती समोर येत आहे त्यानुसार येथे दीड ते दोन हजार लीटर डिझेल जनरेटरसाठी आणि गो कार रेसिंगसाठी एक हजार ते दीड हजार लिटर पेट्रोल ठेवण्यात आले होते. सुदैवाने या पेट्रोल डिझेलपर्यंत आग पोहोचली नाही अन्यथा आग प्रचंड भडकली असती. या आगीवर नियंत्रण मिळवणे अधिक कठीण होऊन बसले असते. मयतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असती.
या गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि आत येण्यासाठी सहा ते सात फुटांचा एकच रस्ता होता. शनिवारी एन्ट्रीसाठी 99 रुपयांची स्कीम ठेवण्यात आली होती त्यामुळे जास्त गर्दी झाली होती. आग लागल्यानंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या मुलांनी काय घडलं ते सांगितलं. अचानक कुणीतरी आम्हाला येऊन सांगितलं की आग लागली आहे. त्यामुळे आमच्याबरोबरील सर्व लोक घाबरले आणि पळत सुटले. परंतु, काही जणांना बाहेर येता आलं नाही. कारण पहिल्या मजल्यावरून बाहेर येण्यासाठी फक्त एकच रस्ता होता.
दिल्लीत अग्नितांडव! हॉस्पिटलला भीषण आग; सहा नवजात बालकांचा मृत्यू
या घटनेनंतर प्रशासनाने कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. राजकोट गेम झोनचा संचालक, मालकासह तीन जणांना अट करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या नेतृत्वात पाच अधिकाऱ्यांची एसआयटी या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. समिती 72 तासांत अहवाल देणार आहे. आग का लागली, गेमिंग झोनला मंजुरी होती का, फायर विभागाचे एनओसी होते का, गेम झोनच्या निर्माणासाठीचे नियम पाळले गेले का, आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास बचावासाठी काय व्यवस्था होती या महत्वाच्या गोष्टींचा तपास समिती करणार आहे.