Download App

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अन् विदेशात शिक्षणाची संधी; टाटा समुहाच्या स्कॉलरशीप योजना किती ?

रतन टाटा प्रत्येकाची मदत करायचे. पैशांअभावी कुणाचं शिक्षण थांबू नये यासाठी अनेक स्कॉलरशीप योजना टाटा समुहाकडून चालवल्या जात आहेत.

TATA Scholarship : जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे आधारस्तंभ रतन टाटा यांचं बुधवारी निधन झालं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. देशाच्या जडणघडणीत टाटा समुहाचं सुरुवातीपासूनच मोठं योगदान राहिलं. रतन टाटा यांनीही आपल्या कुटुंबाचा हा वारसा पुढे चालवला.

देशातील कोट्यावधी नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम टाटांनी केलं. कोट्यावधी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिलं. विकसित भारताच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे त्यात टाटा उद्योग समुहाचाही मोठा वाटा आहे. आज याच परिवारातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांचं सामाजिक कार्य देखील वाखाणण्याजोगं होतं. विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्यात रतन टाटा नेहमीच पुढे असायचे. आज आपण टाटांच्या शिक्ष क्षेत्रातील याच योगदानाची माहिती घेऊ या..

रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा ग्रुपचे प्रमुख राहिले. टाटा समुहाच्या 100 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांची एकूण उलाढाला 100 अब्ज डॉलर्स आहे. भारता व्यतिरिक्त जगातील अनेक देशांत टाटा समुहाच्या व्यापाराचा विस्तार आहे. टाटा प्रत्येकाची मदत करायचे. पैशांअभावी कुणाचं शिक्षण थांबू नये यासाठी अनेक स्कॉलरशीप योजना टाटा समुहाकडून चालवल्या जात आहेत.

रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज दुखवटा; सर्व कार्यक्रम रद्द, मुंबईत होणार अंत्यसंस्कार

Tata Scholarship Scheme : टाटा स्कॉलरशीप

हुशार विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावं यासाठी टाटा समुहाकडून स्कॉलरशीप देण्यात येते. अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीला बरोबर घेत टाटा समूह भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप देतो. या योजनेत दरवर्षी वीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीत जवळपास तीन कोटी रुपये दिले जातात. यामध्ये ग्रॅज्यूएशनचा संपूर्ण खर्च आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असतो. या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याचे अॅडमिशन कॉर्नेल विद्यापीठात होणे आवश्यक आहे.

Tata Steel Millennium Scholarship : टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशीप

प्रतिभावान पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशीप दिली जाते. ही योजना कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आहे. यामध्ये दिव्यांग मुलांना प्राधान्य दिले जाते. शिक्षणासाठी 50 हजार रुपये मुलांच्या शिक्षणासाठी दिले जातात.

Tata Capital Pankh Scholarship : टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशीप

या स्कॉलरशीप योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळते. या योजनेच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास किमान 60 टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चार लाखांपेक्षा जास्त नसावं. पात्र विद्यार्थ्यास 75 हजार रुपये स्कॉलरशीप दिली जाते. सामान्य आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

रतन टाटा : टाटा ग्रुपचे आधारस्तंभ ते समस्त देशाला अभिमान वाटावे असे उद्योगपती

Tata Innovation Fellowship : टाटा इनोवेशन फेलोशिप

रिसर्चला आधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टाटा समुहाकडून टाटा इनोवेशन फेलोशिप योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारास दरमहा 25 हजार रुपये दिले जातात. ही योजना भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे. टाटा समुहाकडून संचालित सर्व फेलोशिप आणि स्कॉलरशीप योजनांसाठी अर्ज मागवण्यात येतात. निवडीनंतर विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला जातो.

follow us