Download App

लिटमस टेस्टमध्ये नापास होताच राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; ‘बेस्ट’ राजकारणाची तुफान चर्चा

राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

Raj Thackeray and Devendra Fadnavis : आज सकाळीच राज्याचं राजकारण ढवळून काढणारी घडामोड घडली. मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. या भेटीत काय राजकीय चर्चा झाला याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेने संयुक्त पॅनल देऊनही पराभव झाला. एकही उमेदवार निवडून आला नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुी आधीच्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँड पुरता अपयशी ठरला. या पराभवाची चर्चा सुरू  असतानाच राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने मुंबईच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत. राज ठाकरे जरी नागरिकांचे प्रश्न घेऊन फडणवीसांकडे गेले असले तरी कालच्या बेस्ट पतपेढी निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव झाला. त्यानंतर राज ठाकरे आज सकाळीच फडणवीसांची भेट घेण्यास पोहोचल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना एकही जागा या निवडणुकीत जिंकता आली नाही. या दारूण पराभवानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे ब्रँडची प्रचंड खिल्ली उडवली. तसेच मोठ्या प्रमाणात टीकाही केली. ठाकरे ब्रँडवर टीका करताना मात्र भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राज ठाकरे यांच्याबद्दल एकाही भाजप नेत्याने एकही शब्द उच्चारला नाही. भाजप नेते उद्धव ठाकरेंवर टीका करत होते मात्र राज ठाकरेंबद्दल बोलताना मात्र सहानुभूतीपूर्वक बोलत होते. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परत येण्याची आशा असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

आता ‘वेल्हे’ नाही ‘राजगड’ म्हणायचं, फडणवीस सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची मंजुरी

राज ठाकरे या पार्श्वभूमीवर आज सकाळी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीसोबतचे दोर अजूनही पूर्णपणे कापलेले नाहीत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर पुढे काय घडणार याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.

‘ठाकरेंचा’चा दारूण पराभव

मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. निवडणूक निकालात मात्र ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचेही 7 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.

राज आणि फडणवीसांच्या गुप्त भेटी

यापुर्वीही जेव्हा शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरू असताना 12 जून रोजी वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे वरळी येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या घडामोडींना वेग आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच्या फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे शिवसेना-मनसे युतीच्या प्रक्रिया पुन्हा थंडावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

“देवाभाऊ जोमात, ठाकरे ब्रँड..” महायुतीने फक्त उद्धव ठाकरेंनाच डिवचलं; सेना भवनाबाहेर काय घडलं?

सामंत-राऊतांची प्रतिक्रिया

मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघंही टायमिंग साधण्यात माहीर आहेत. दोघांमध्ये भेट नेमकी कोणत्या विषयावर होतेय, याची माहिती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसचं देऊ शकतात. राज ठाकरेंनी महायुतीमध्ये यावे, अशी आमचीही इच्छा आहे”. खासदार संजय राऊत या भेटीवर बोलताना म्हणाले की, “विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल”, असं संजय राऊत म्हणाले.

follow us