Download App

सर्वसामान्यांना दिलासा! कर्जाचे हप्ते वाढणार नाहीत, RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’

RBI Monetary Policy June 2023 :  सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. रिजर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दर (Repo Rate) 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय (RBI Monetary Policy) घेतला आहे. बँकेचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत दोन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. देशात सातत्याने वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण ठेवणे आणि दुसरे म्हणजे बदलत चाललेल्या जागतिक परिस्थितीला तोंड देणे. उच्च किरकोळ चलनवाढ आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी विशेषतः युएस फेडरल रिजर्व्हने केलेली व्याजदर वाढ लक्षात घेता बँकेच्या समितीची ही बैठक अत्यंत महत्वाची होती.

दास यांनी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि अन्य संबंधित निर्णयांची माहिती दिली. या व्यतिरिक्त त्यांनी देशांतर्गत आणि जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. अर्थतज्ज्ञांनी याआधीच अशी शक्यता व्यक्त केली होती की यंदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्यांनी व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरला आहे.

बैठकीतील महत्वाच्या घोषणा

. चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

. आर्थिक वर्ष 2024 साठी 6.5 टक्क्यांची वाढ गृहीत धरण्यात आली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर आधीच्या अंदाजानुसार 5.2 टक्क्यांवरून 5.1 टक्के करण्यात आला आहे.

. महागाई 4 टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि उर्वरित काळात ती तशीच राहिल असे अपेक्षित आहे.

. भारताकडे परकीय चलनाचा साठा पुरेसा आहे. अर्थव्यवस्थेच्या गरजांसाठी साधने निश्चित करताना आरबीआय आपल्या व्यवस्थापनात सजग असेल.

. चौथ्या तिमाहीत देशाची चालू खात्यातील तूट आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच सध्या ही तूट आटोपशीर राहिल.

. रिजर्व्ह बँकेने रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच आरबीआयने गैर बँकिंग कंपन्यांना ई रूपी व्हाउचर जारी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

नऊ महिन्यात 2.5 टक्क्यांनी वाढला रेपो रेट 

देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुरू असलेली रिकव्हरी कायम ठेवण्यासाठी आणि रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉइंटसने वाढ केली होती. त्याआधी डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात बँकेने रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत बँकेने रेपो दरात 250 बेसिस पॉइंटस म्हणजेच 2.5 टक्के वाढ केली आहे.

Tags

follow us