हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटले जाणारे रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काल (3 डिसेंबर) निकाल लागल्यानंतरच रेड्डी यांच्या नावाची चर्चा होती. आज (4 डिसेंबर) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, आज रात्री आठ वाजता रेड्डी यांचा राजभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. (Revanth Reddy will be the new Chief Minister of the Telangana state)
आज काँग्रेसचे राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर हैदराबाद येथील एला हॉटेलमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार, पक्षाचे वरिष्ठ अधिकारी, माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह निरीक्षक टीमची बैठक पाडली. या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांनी मुख्यमंत्री निवडीचे अंतिम अधिकार मल्लिकार्जुन खर्गे यांना दिला होता.
#WATCH | Hyderabad, Telangana: Karnataka Deputy CM DK Shivakumar says "Today we had a meeting of the Congress Legislature Party of the newly elected members of the party. We thank the people of the state for allowing us to form our govt here…All the members of the newly elected… pic.twitter.com/HAbTjWYE9t
— ANI (@ANI) December 4, 2023
तेलंगणात तीन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती यातील सर्वात मोठे नाव म्हणजे रेवंत रेड्डी यांचेच होते. याशिवाय भट्टी विक्रमार्का मल्लूही शर्यतीत होते. तब्बल 1400 किलोमीटरच्या पदयात्रेनंतर मल्लू चर्चेत आले होते. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी हेही या शर्यतीत होते. मात्र आता या दोघांचीही नावे मागे पडली असून रेवंथ रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.
दरम्यान, रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. या लोकांनी रेवंत रेड्डी यांच्या उमेदवारीला विरोध केला, भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले.