Download App

पहिलं लग्न मग् घटस्फोट… नंतर गर्लफ्रेंडची ‘सोशल एन्ट्री’, तेज प्रतापची संपूर्ण कहाणी

Tej Pratap Yadav Love Story With Anushka Yadav : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे (Tej Pratap Yadav) मोठे पुत्र तेज प्रताप यादव त्यांच्या नवीन कारनाम्यांमुळे (Politics) अनेकदा चर्चेत राहिले आहेत. तेज प्रताप यादव पुन्हा एकदा वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. तेज प्रताप यादव यांच्या प्रेमकथेने बिहार आणि लालू कुटुंबात खळबळ उडाली आहे. आजकाल, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे कुटुंब बिहारच्या (Bihar) राजकारणात अडचणींच्या भोवऱ्यात अडकल्याचं कळतं.

एकीकडे कुटुंबावर कायदेशीर दबाव वाढत आहे. तर दुसरीकडे, कौटुंबिक वादामुळे लालू कुटुंबात देखील राजकीय भूकंप आल्याचं चित्र आहे. तेज प्रताप यादव यांची प्रेमकहाणी आणि वैवाहिक वादामुळे लालू कुटुंब अशा चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनुष्का यादवसोबतच्या 12 वर्षांच्या नात्याचा खुलासा केलाय. तेव्हापासून बिहारच्या राजकारणात फक्त एकच मुद्दा गाजत आहे. तेज प्रताप यादव यांच्या पहिल्या लग्नापासून घटस्फोटापर्यंतची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO

तेज प्रतापच्या प्रेयसीचा फोटो व्हायरल

तेज प्रताप आधीच विवाहित आहेत, परंतु त्यांची पहिली पत्नी ऐश्वर्या रायशी लग्न केल्यानंतर काही महिन्यांतच तेज प्रताप यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. तेज प्रताप यादव यांचे लग्न 12 मे 2018 रोजी पटनामध्ये थाटामाटात पार पडलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात, बिहार सरकारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय आणि तेज प्रताप यांनी लग्न केले होते. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झालं होतं.

घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज

दोन्ही कुटुंबे या लग्नावर खूश होती. परंतु लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी 14 मे रोजी एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली, ज्यामध्ये राबडी देवी यांनी म्हटलं होतं की, आमच्या सुनेमध्ये चांगले गुण आहेत. तिच्या आगमनाने घरात खूप आनंद आलाय. यानंतर काही दिवसांनी तेज प्रताप यादव यांनी त्यांची पहिली पत्नी ऐश्वर्या सायकलवर बसलेली असतानाचा फोटोही पोस्ट केला होता, तो खूप व्हायरल झाला होता. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही. अवघ्या सहा महिन्यांनंतर 3 नोव्हेंबर 2018 रोजी, तेज प्रताप यादव यांनी पाटण्याच्या कौटुंबिक न्यायालयात ऐश्वर्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

त्यावेळीही खूप राजकारण झाले होते. विरोधकांनी लालू कुटुंबावर तुटून पडले होते. राबडीच्या निवासस्थानातून बाहेर पडताना ऐश्वर्याचा रडण्याचा व्हिडिओही खूप चर्चेत आला. सध्या तेज प्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यातील घटस्फोट आणि घरगुती हिंसाचाराचा खटला न्यायालयात सुरू आहे. 27 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने एक आदेश दिला होता, यामध्ये न्यायालयाने याचिकाकर्ता तेज प्रताप यादव यांना एका महिन्याच्या आत ऐश्वर्याच्या राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. घरभाडे आणि वीज बिलाचा खर्च उचलण्याचे आदेशही देण्यात आले होते.

निर्माती होण्यापूर्वी एकता कपूरला काय बनायचे होते? स्वतःचं केला मोठा खुलासा केला

तेज प्रताप यांना न्यायालयाने दिला आदेश

न्यायालयाने तेज प्रताप यांना ऐश्वर्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये, असे आदेशही दिले होते. तेज प्रताप आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाचे प्रकरण पूर्णपणे थंडावले नव्हते, तेच आता पुन्हा एकदा तेज प्रताप आणि अनुष्का यादवचे प्रकरण चर्चेत आलं. आता लालू यादव यांचे विरोधक त्यांच्यावर यावरून सतत हल्ला करत आहेत. लालू यादव यांचे मेहुणे सुभाष यादव यांनी तर असा दावा केलाय की, तेज प्रताप यांच्या लग्नापूर्वीही हे नाते होते आणि सर्वांना त्याबद्दल माहिती होती, परंतु तेज प्रताप यांचे जबरदस्तीने ऐश्वर्या रायशी लग्न करण्यात आले. या वादानंतर लालू यादव यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पक्ष आणि कुटुंबातून बाजूला केल्याची माहिती मिळतेय.

 

follow us