Muffler History : रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ ची चर्चा; पण, मफलरचा प्रवास कसा?

Muffler History राजकारणात एखादी छोटीशी गोष्टही मोठी चर्चा घडवून आणते. कधी एखादी टोपी, कधी एखादा फेटा, तर कधी एखादे मफलर नेत्याची ओळख बनते.

Muffler History

Muffler History

Muffler History :  राजकारणात एखादी छोटीशी गोष्टही मोठी चर्चा घडवून आणू शकते. कधी एखादी टोपी, कधी एखादा फेटा, तर कधी एखादे जॅकेट नेत्याची ओळख बनते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक मफलर चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सोमवारी, 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी मफलर घातलेल्या व्यक्तीची पोस्ट टाकली आहे. त्यावर अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा नेता कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, पोस्टरवर कोणाचेही नाव नाही. त्यामुळे या ‘मफलर मॅन’बाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पण या राजकीय चर्चेच्या पलीकडे मफलरची स्वतःची एक रंजक कहाणी आहे. मफलरचा प्रवास नेमका कसा? त्याबद्दल जाणून घेऊया…

मफलरचा उगम कुठून झाला आणि कधीपासून वापर सुरू झाला?

आज मफलर म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते गळ्याभोवती गुंडाळलेले लोकरीचे कापड. मात्र, मफलरचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. इतिहासकारांच्या नोंदींनुसार, प्राचीन रोममध्ये ‘सुडॅरियम’ नावाचे कापड वापरले जात असे. हे कापड गळ्याभोवती किंवा कमरेला बांधले जात असे आणि प्रामुख्याने घाम पुसण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. पुढे युरोपमध्ये गळ्यात कापड गुंडाळण्याची पद्धत विकसित झाली. ‘मफलर’ हा शब्द इंग्रजी भाषेत 1530 च्या दशकात वापरात आल्याची नोंद आहे. सुरुवातीला गळा आणि चेहऱ्याचा खालचा भाग झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उबदार कापडासाठी हा शब्द वापरला जात होता. हा शब्द ‘Muffle’ या शब्दाशी संबंधित आहे. त्याचा अर्थ झाकणे किंवा गुंडाळणे असा होतो.

सैनिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत मफलर पोहोचला

मफलरचा वापर पुढे केवळ थंडीपासून संरक्षणापुरता मर्यादित राहिला नाही. युरोपमध्ये तो हळूहळू फॅशनचा भाग बनला. 1600 च्या दशकात क्रोएशियन सैनिक गळ्यात रंगीत कापड बांधत असत. पुढे या पद्धतीतून ‘क्रॅव्हेट’ या गळ्यात बांधल्या जाणाऱ्या वस्त्राचा प्रसार झाला. व्हिक्टोरियन काळात लोकरीचे आणि फरचे स्कार्फ लोकप्रिय झाले. थंड हवामानात कोट आणि जॅकेटसोबत मफलर वापरण्याची पद्धत रूढ झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून महिलांनी मोठ्या प्रमाणावर लोकरीचे मफलर, मोजे आणि इतर उबदार कपडे विणले. त्यामुळे मफलरचा वापर सर्वसामान्यांच्या जीवनात अधिक लोकप्रिय झाला.

काळानुसार मफलरच्या वापरात अनेक बदल झाले. लोकरीपासून कापूस, रेशीम आणि विविध कृत्रिम धाग्यांपासून मफलर तयार होऊ लागले. रंग, डिझाइन, विणकाम आणि बांधण्याच्या पद्धतींमध्येही विविधता आली. काही जण मफलर गळ्याभोवती गुंडाळतात, तर काही जण तो डोक्यावरून आणि कानांवरून बांधतात. हिवाळ्यात उबदारपणा देण्यासोबतच व्यक्तिमत्त्वाला वेगळी झलक देणारे फॅशन अॅक्सेसरी म्हणूनही त्याचा वापर वाढला.

महाराष्ट्रातील ‘मफलरमॅन’ म्हटलं की पहिले नाव येतं छगन भुजबळांचं

राजकारणात एखाद्या नेत्याची वेशभूषा ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जनमानसातील प्रतिमेचा भाग बनते. गांधी टोपी, नेहरू जॅकेट, फेटा, पांढरा कुर्ता किंवा मफलर अशा गोष्टी नेत्याची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मफलरची चर्चा झाली की सर्वप्रथम नाव समोर येते ते म्हणजे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे. हिवाळा असो किंवा उन्हाळा, त्यांच्या गळ्यात मफलर दिसतोच. त्यामुळे मफलर ही त्यांची खास ओळख बनली आहे.

विशेष म्हणजे, भुजबळ यांनी मफलर वापरण्याची सुरुवात फॅशन म्हणून नव्हे, तर गरज म्हणून सुरू केली. खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला थंडी वैगरे लागू नये म्हणून त्यांनी मफलर वापरण्यास सुरुवात केली. पुढे हेच मफलर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनले. भुजबळ यांच्याकडे विविध प्रकारच्या मफलरचा मोठा संग्रह असल्याचे सांगितले जाते. त्यांना भेटायला येणारे समर्थक आणि चाहते मफलर भेट देतात. त्यामुळे त्यांच्या संग्रहात सातत्याने भर पडत असते.

दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ‘मफलरमॅन’ म्हणून ओळखले जाते. केजरीवाल यांचा थंडीच्या दिवसांतील मफलर घातलेला साधा पेहराव देशभर चर्चेत आला होता. 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘Muffler Man Returns’ ही संकल्पनाही चर्चेत आली होती.

आता रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मफलर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पोस्टमधील व्यक्ती नेमकी कोण, त्यामागे कोणता राजकीय संदर्भ आहे आणि रोहित पवार पत्रकार परिषदेत काय खुलासा करणार, याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पण एकेकाळी थंडीपासून संरक्षण करणारा मफलर आज काही नेत्यांची ओळख बनला असून, 16 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार या मफलर घातलेल्या व्यक्तीचे कोणते रहस्य उलगडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version