Ropeway Breaks in Pavgad Gujarat : गुजरातमधील पावगड येथी प्रसिद्ध शक्तीपीठामध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भाविक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा रोपवे अचानक तुटून पडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लिफ्टमन, दोन कर्मचारी आणि इतर दोन लोक होते.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि मदतकार्य सुरू केलं. (Gujarat) गुजरात प्रशासनाने अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार; या राज्याने घेतला मोठा निर्णय
समोर आलेल्या अहवालानुसार, खराब हवामानामुळे प्रवासी रोपवे बंद होता. परंतु, तीर्थक्षेत्रावर सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी बांधकाम साहित्य पोहोचवण्यासाठी मालवाहू रोपवे चालवला जात होता. माँ महाकालीचे प्रसिद्ध शक्तीपीठ पंचमहाल जिल्ह्यातील पावगड टेकडीच्या शिखरावर आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ चंपानेरच्या अगदी समोर आहे.
हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, ते देवी सतीचे अवयव पडलेल्या ५१ ठिकाणांपैकी एक आहे. हे मंदिर पूर्वी लहान आणि जीर्ण अवस्थेत होते. परंतु, जुलै २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने त्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहणही येथे केलं होतं.
गेल्या वर्षी गुजरात सरकार आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने पावगड रोपवेच्या विस्ताराला मान्यता दिली होती. रोपवेमध्ये फक्त दुधिया तालबपर्यंत जाण्याची सुविधा होती. नवीन योजनेअंतर्गत, दुधिया तालब येथे आणखी एक स्टेशन बांधण्यास मान्यता देण्यात आली, जेणेकरून भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी ४४९ पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत.