Download App

Sanatan Dharma : ‘सनातन’ वादाची ‘सुप्रीम’ दखल; उदयनिधींना धाडली नोटीस

Sanatan Dharma : तामिळनाडू सरकारचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली होती. या वादाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी चेन्नईतील एका कार्यक्रमात सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी तुलना करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या धर्माला संपवून टाकले पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. लोकांनी संताप व्यक्त केला. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. या दरम्यान न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली.

स्टॅलिनविरुद्ध गुन्हा दाखल

स्टॅलिन यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. तसेच अनेक हिंदू संघटनांना निषेध केला होता. यानंतर मिरा रोड येथील पोलीस ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी उदयनिधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेशातील रामपूर येथेही वकिलाच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत देशात ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती. इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही हा वाद शांत झालेला नाही. भाजपने यावर अधिक आक्रमक होण्याचे ठरवले आहे. त्यांचे नेते प्रत्येक सभांतून हा मुद्दा चांगलाच उचलून धरत असून इंडिया आघाडीवर टीका करत आहेत.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन ?

सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतरही स्टॅलिन यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते.

MK Stalin : मुलासाठी बाप मैदानात; उदयनिधींच्या वक्तव्यावर CM स्टॅलिन यांनी सोडले मौन

Tags

follow us