SEBI Gold Fund Restrictions What Investors Need to Know : सणासुदीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भांडवली बाजार नियामक म्हणजे SEBI च्या निर्देशांनंतर म्युच्युअल फंड कंपन्यांनी गोल्ड फंड ऑफ फंड्स (FoFs) मध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारणे थांबवले आहे. 16 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या निर्णयामुळे नवीन एकरकमी गुंतवणूक, नवीन SIP नोंदणी आणि या फंडांमध्ये इतर योजनांमधून पैसे वळवण्यावर निर्बंध आले आहेत.
मात्र, याचा अर्थ सोन्याशी संबंधित सर्व गुंतवणूक पर्याय बंद झाले आहेत, असा नाही. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मधील शेअर बाजारातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. तसेच, उपलब्ध माहितीनुसार, आधीपासून सुरू असलेल्या SIP आणि स्वतंत्र सिल्व्हर फंडांबाबतही वेगळी स्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नेमका कोणत्या प्रकारच्या फंडावर निर्बंध आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.
गोल्ड FoF म्हणजे नेमकं काय?
गोल्ड फंड ऑफ फंड्स म्हणजे अशी म्युच्युअल फंड योजना, जी थेट सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्वतः डिमॅट खाते उघडण्याची गरज न पडता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करता येते. भारतातील गोल्ड ETF उद्योग सुमारे 1.7 लाख कोटी रुपये आहे. त्यातील जवळपास एकतृतीयांश गुंतवणूक FoF च्या माध्यमातून येते. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम विशेषतः म्युच्युअल फंडांमार्फत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुंतवणुकीवर निर्बंध का?
या निर्णयामागे रुपयावरील दबाव आणि सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्याची गरज ही संभाव्य कारणे असल्याचे प्रकाशित वृत्तांत नमुद करण्यात आले आहे. कारण, भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. सोन्याची मागणी वाढल्यास आयातीसाठी परकीय चलनाची गरज वाढू शकते आणि चालू खात्यातील तूट वाढण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोन्याशी संबंधित गुंतवणुकीचा ओघ मर्यादित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग असू शकतो. मात्र, निर्बंधांमागचे अधिकृत कारण SEBI ने सार्वजनिकरीत्या स्पष्ट केल्याची माहिती उपलब्ध नाही.
गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होणार?
– संबंधित गोल्ड FoF मध्ये नवीन एकरकमी गुंतवणूक आणि नवीन SIP नोंदणी करता येणार नाही.
– आधीपासून नोंदणीकृत SIP चे हप्ते सुरू राहतील.
– विद्यमान गुंतवणूकदारांना नियमानुसार पैसे काढता येतील.
– शेअर बाजारात गोल्ड ETF चे व्यवहार सुरू राहतील; मात्र त्यासाठी डिमॅट खाते आवश्यक असते.
– नवीन STP, स्विच-इन आणि SIP मधील अतिरिक्त गुंतवणूक यांवर संबंधित फंडाच्या सूचनेनुसार निर्बंध असू शकतात.
गोल्ड FoF मधील नवीन गुंतवणुकीला निर्बंध असले, तरी गोल्ड ETF हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ETF ची बाजारातील किंमत त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा (NAV) जास्त असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारभाव आणि NAV यांची तुलना करणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच गोल्ड FoF मधील नवीन गुंतवणुकीवर निर्बंध आले असले, तरी सोन्यातील सर्व गुंतवणुकीचे मार्ग बंद झालेले नाहीत. गुंतवणूकदारांनी आपल्या फंड हाऊसची अधिकृत सूचना तपासूनच पुढील निर्णय घ्यावा. सेबीने टाकलेले हे निर्बंध तात्पुरते असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे निर्बंध कधी उठवले जातील याबाबत निश्चित माहिती सध्या उपलब्ध नाही.
