नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना बाबरी मशिदीचे काहीही होणार नाही या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला होता, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबरी मश्जिद मुद्दा चर्चेत आणला आहे. ते काल (8 ऑगस्ट) एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. (Sharad Pawar’s Big Claim On BJP Leader’s ‘Babri Assurance)
ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड’ या पुस्तकाचे काल उद्घाटन झाले. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशी थरूर, माजी रेल्वे मंत्री आणि भाजप नेते दिनेश त्रिवेदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पवार उपस्थित होते.
1992 मध्ये जेव्हा रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला होता. तेव्हा भाजप नेत्या विजया राजे सिंधिया यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांना बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला आपण दिला होता. मात्र नरसिंह राव यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध सिंधिया यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, असे पवार म्हणाले.
बाबरी मशीद विध्वंसाच्या वेळी शरद पवार संरक्षण मंत्री होते. हा संदर्भ गेत ते म्हणाले, त्या बैठकीला गृहमंत्री आणि गृहसचिवांसह एक गट उपस्थित होता. त्या बैठकीला मीही उपस्थित होतो. त्यावेळी पंतप्रधानांनी संबंधित पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवावी, असे ठरले. त्या बैठकीत विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांना दिले होते.
मात्र मला, गृहमंत्र्यांना आणि गृहसचिवांना वाटले की काहीही होऊ शकते, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये. परंतु नरसिंह राव यांनी सिंधियावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पत्रकार नीरजा चौधरी यांनी पीव्ही नरसिंह राव यांचा काही ज्येष्ठ पत्रकारांशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत त्यांनी विध्वंसास परवानगी दिल्याचा आरोप केला.
तर मनमोहन सिंग सरकारमधील माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनांना योग्य पद्धतीने न हाताळणे हे काँग्रेस आघाडी सरकार सत्तेतून बाहेर पडण्याचे कारण होते. त्यापूर्वीच अनेक घोटाळे समोर आले होते.