सोशल मीडियावरील जाहिरातीवर क्लिक करणं पडलं महागात; काही क्षणांतच खात्यातून 98 हजार गायब

Social Media Ad Scam : सोशल मीडियावर दिसलेल्या एका जाहिरातीने ग्वाल्हेरमधील जोडप्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

News Photo   2026 11 02T173702.932

Social Media Ad Scam

Social Media Ad Scam : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सोशल मीडियावर दिसलेल्या एका जाहिरातीवर क्लिक करणं जोडप्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. जाहिरात पाहून ती उघडण्याचा मोह आवरता न आल्याने काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून हजारो रुपये गायब झाले. जयप्रताप सिंग बाथम यांच्या पत्नीला मोबाइलवर रील्स पाहताना एक जाहिरात दिसली. ती आवडल्याने त्यांनी त्यावर क्लिक करून जाहिरात उघडली. मात्र, या एका क्लिकनंतर त्यांना सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला.

जाहिरातीवर क्लिक करताच मोबाइल अचानक हँग झाला आणि फोनमधील सर्व फंक्शन बंद पडले. काही वेळाने मोबाइल स्विच ऑफ झाला. सुरुवातीला जास्त वेळ रील्स पाहिल्यामुळे किंवा फोनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे असं घडलं असावं, असा त्यांचा समज झाला. मोबाइल दुरुस्त केल्यानंतर तो पुन्हा सुरूही झाला. त्यामुळे सुरुवातीला या घटनेमागे काही संशयास्पद प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. मात्र, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून 2,970 रुपये कपात झाल्याचा संदेश आला आणि जोडप्याला धक्का बसला.

आपण कोणताही व्यवहार केला नसताना खात्यातून पैसे कसे गेले, असा प्रश्न पडल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. त्यानंतर बँकेत जाऊन खात्याचं स्टेटमेंट तपासलं असता फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला. यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून एका रात्रीत तीन वेळा व्यवहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून एकूण 98,000 रुपये काढण्यात आल्याचं स्पष्ट झालं. जाहिरातीवर केलेल्या एका क्लिकमुळे इतकी मोठी रक्कम गमवावी लागल्याने जोडप्याला मोठा धक्का बसला.

या घटनेनंतर जयप्रताप सिंग बाथम आणि त्यांच्या पत्नीने पुरानी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सायबर पोलिसांकडे सोपवला आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मोबाइलमध्ये नेमका कोणता तांत्रिक बदल झाला आणि त्यानंतर खात्यातील रक्कम कशी काढण्यात आली, याचा तपास केला जात आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनोळखी जाहिराती किंवा लिंकवर विचार न करता क्लिक करणं किती महागात पडू शकतं, हे या घटनेतून समोर आलं आहे.

Exit mobile version