दुबई-थायलंडमधून चालणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार गणेश काळे भारतात अटक

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

  • Written By: Published:
Untitled Design 81

Cyber ​​fraud racket busted : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी रॅकेटचा भांडाफोड करत दुबई आणि थायलंडमधून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून 11 0जून 2026 रोजी त्याला भारतात आणून अधिकृत अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे असून तो दुबईतून सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्यातील ऑनलाइन टास्क स्कॅम, हिंजवडी पोलीस ठाण्यातील शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक आणि सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल 2 कोटी 66 लाख रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणांच्या तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा झाला. जून 2024 मध्ये देहूरोड प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून आरोपी दीपक गाडे हा दुबईत जाऊन गणेश काळे याला भेटल्याचे उघड झाले. तसेच भारतातील विविध बँक खात्यांची माहिती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड आरोपी काळेला पुरवले जात असल्याचे समोर आले.

सायबर पोलिसांच्या तपासात गणेश काळे याने दुबईमध्ये सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू केल्याचे स्पष्ट झाले. भारतातील विविध व्यक्तींकडून मिळवलेल्या ‘म्युल अकाउंट्स’च्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांतील रक्कम वळविण्याचे काम तो करत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासातून आरोपीचे चीनसह इतर परदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचेही निष्पन्न झाले. या नेटवर्कच्या मदतीने ऑनलाइन टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध क्लृप्त्या वापरून भारतीय नागरिकांची फसवणूक केली जात होती.

तपासाचा फास आवळला जात असल्याची चाहूल लागताच गणेश काळे सप्टेंबर 2025 मध्ये दुबई सोडून थायलंडमधील बँकॉक येथे पळून गेला. मात्र पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर इंटरपोलमार्फत त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस आणि लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले.

युद्ध संपलं, करार फक्त औपचारिकता; ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याने खळबळ, पण इराणकडून अद्याप हिरवा कंदील नाही

केंद्रीय गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून गणेश काळे हा थायलंडमधून अन्य देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर पकडला गेला. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. 11 जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार हेमंत खरात आणि पोलीस शिपाई नितेश बिचेवार यांच्या पथकाने त्याचा ताबा घेतला. त्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

गणेश काळेच्या अटकेमुळे देशातील विविध भागांतील अनेक गंभीर सायबर गुन्ह्यांची उकल झाली आहे. मुंबईतील नोडल सायबर पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाणे तसेच तेलंगणातील सायबराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक प्रकरणांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. ही धडक कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिवास पवार, तत्कालीन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या तपासात पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोनण, दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांसाठीच नव्हे तर देशातील सायबर तपास यंत्रणांसाठीही एक मोठे यश मानले जात आहे.

follow us