Download App

शेअर बाजाराला कोणाची नजर लागली? ‘या’ 5 कारणांमुळे गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले

Stock Market Investors lost Rs 5.5 lakh crore : शेअर बाजारात (Stock Market) आज सलग तिसऱ्या व्यवहार दिवशी घसरण दिसून आली. आजची घसरण ही मोठी घसरण मानली जात आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे मूडीजने अमेरिकन सरकारच्या रेटिंगमध्ये केलेली घट. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून त्यांचे पैसे काढून घेतले (Share Market) आहेत. शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) घसरण दिसून आली.

विशेष म्हणजे भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर सेन्सेक्समध्ये 1300 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी तीन व्यापारी दिवसांत 378 अंकांनी घसरला आहे. मंगळवारी गुंतवणूकदारांचे (Investment) 5.50 लाख कोटी रुपये नुकसान झाले.

सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी घसरण दिसून येत आहे. जर आकडेवारी पाहिली तर, मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 872.98 अंकांच्या घसरणीसह 81,186.44 अंकांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान सेन्सेक्स 905.72 अंकांनी घसरून 81,153.70 अंकांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी देखील 261.55 अंकांच्या घसरणीसह 24,683.90 अंकांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 275.75 अंकांनी घसरून 24,669 अंकांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

आज कोणते स्टॉक पडले?

आज ऑटो, आयटी, बँकिंग आणि वित्त असे कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिले नाही, जिथे घसरण झाली नाही. बीएसईच्या आकडेवारीनुसार मारुतीच्या शेअर्समध्ये 2.76 टक्क्यांची घसरण झाली. तर महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 2.13 टक्क्यांनी घसरून बंद झाले. पॉवरग्रीड आणि अल्ट्रा सिमेंटच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर टायटन, कोटक, रिलायन्स, एसबीआय, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

शेअर बाजार कोसळण्याची कारणे कोणती?

मूडीजने अमेरिकन सरकारचे क्रेडिट रेटिंग AAA वरून Aa1 पर्यंत कमी केले आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने जागतिक बाजारपेठेत तरलता कमी होण्याची भीती वाढली आहे, याचा परिणाम उदयोन्मुख बाजारपेठांवर अनेकदा होतो.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सावधगिरी बाळगली. त्यांनी 19 मे रोजी 526 कोटी रुपये काढून घेतले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 238 कोटी रुपयांची विक्री केली. गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त काळातील ही पहिलीच घटना होती, जेव्हा एफआयआय आणि डीआयआयने एकाच वेळी शेअर्स विकले.

ऑपरेशन सिंदूर युद्धबंदीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे भारतीय बाजारातील अलिकडच्या तेजीमुळे मूल्यांकनात वाढ झाली आहे. गेल्या नऊ सत्रांमध्ये बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 27.3 लाख कोटी रुपयांनी वाढले. आज झालेल्या घसरणीचे कारण गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर केलेल्या नफा वसुलीमुळे होते.

आज शेअर बाजारात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. या यादीत, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, मारुती आणि बजाज फायनान्स हे सर्वात जास्त घसरलेले शेअर्स होते. इटरनल (पूर्वीचे झोमॅटो) चे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले.

कोविडच्या नवीन प्रकाराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतो. ताज्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 257 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडच्या नवीन प्रकाराचा सर्वाधिक परिणाम केरळमध्ये दिसून आला. या राज्यात 69 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

 

follow us