Successful demonstration of ‘Rudra Shakti’ exercise in Pokhran : दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (PVSM, UYSM, AVSM) यांनी पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्सरसाइज रुद्र शक्ती’ या सर्वशस्त्र युद्धसरावाचे पुनरावलोकन केले. रुद्र ब्रिगेडकडून राबवण्यात आलेल्या या थेट गोळीबारासह युद्धसरावातून बदलत्या युद्धपरिस्थितीत उच्च तीव्रतेच्या, एकात्मिक लष्करी मोहिमा राबवण्याची भारतीय सेनेची क्षमता प्रभावीपणे सिद्ध झाली आहे.
‘एक्सरसाइज रुद्र शक्ती’ हा याआधी पार पडलेल्या ‘एक्सरसाइज अखंड प्रहार’चा पुढील टप्पा असून, त्या सरावामध्ये वाळवंटी क्षेत्रातील रुद्र ब्रिगेडची युद्धतत्परता आणि नव्या कार्यपद्धती यशस्वीरीत्या तपासण्यात आल्या होत्या. सद्यःच्या थेट गोळीबार सरावामध्ये यांत्रिक दल, तोफखाना, हवाई संरक्षण युनिट्स, लष्करी हवाई दलाची साधने, ज्यामध्ये ALH-WSI आणि अपाचे हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. तसेच मानवरहित हवाई प्रणाली (UAS) आणि काउंटर-UAS क्षमतांचा समन्वय साधण्यात आला.
या सरावातून जमिनीवरील, हवाई आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये अत्यंत समन्वयाने आणि अचूकतेने लष्करी कारवाई कशी राबवता येते, याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एकात्मिक युद्धक्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यावर या सरावाचा विशेष भर होता.
मोठी बातमी! माजी आमदार राम सातपुतेंना मारण्याच कट, भाजप मंत्र्याचा गंभीर दावा
सरावाच्या पुनरावलोकनादरम्यान लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी प्रत्यक्ष रणांगणावर सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी सर्व अधिकारी व जवानांच्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्ट युद्धतत्परतेचे कौतुक केले. तसेच गुंतागुंतीच्या मोहिमा वेग, अचूकता आणि समन्वयाने पार पाडण्याच्या त्यांच्या क्षमतेचे विशेष अभिनंदन केले.
‘एक्सरसाइज रुद्र शक्ती’ हा भारतीय सेनेतील सुरू असलेल्या व्यापक परिवर्तनाचा ठोस पुरावा आहे. संघटनात्मक नवोन्मेष, रणनितीतील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय यामुळे भारतीय सेना अधिक सक्षम होत आहे. उदयोन्मुख सुरक्षाआव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय सेना सदैव मिशन-रेडी, तंत्रज्ञानसक्षम आणि भविष्याभिमुख राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या सरावातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
