नवी दिल्ली : डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याची आणि काऊन्सलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जाब विचारत उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. (Supreme Court rejects plea to cancel NEET-UG 2024 exam and stay counseling)
परीक्षेची प्रतिष्ठा आणि पावित्र्य बाधित झाले आहे. त्यामुळे आम्हाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीचाही युक्तिवाद ऐकायचा आहे, असे म्हणत आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या याचिकेचा दुस-या याचिकेशीही संबंध जोडला आहे. मात्र तुर्तास तरी न्यायालयाने NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याची आणि काऊन्सलिंगला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
Supreme Court says the sanctity of the exam seems to have been affected so it needs an answer from NTA.
Supreme Court refuses to stay the counselling process.
— ANI (@ANI) June 11, 2024
720 गुणांच्या परीक्षेत गतवर्षीपर्यंत किमान 630, 640 पर्यंत गुण मिळावे म्हणून विद्यार्थी जीवतोड मेहनत करायचे, मात्र त्याच परीक्षेत यंदा अनेकांना 720, 719, 718 असे गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परीक्षेशी संबंघित तज्ज्ञ मंडळींच्या मते, NEET परीक्षेत 719 आणि 718 गुण मिळणे अशक्य आहे. कारण प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एका गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असते. विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडवल्यास त्याला 720 पैकी 720 गुण मिळतात. एक प्रश्न राहिल्यास 716 तर दोन राहिल्यास 712 गुण मिळतात. जर त्याने एक प्रश्न चुकीचा सोडवला, तर चार अधिक एक असे पाच गुण कापले जातात. अशा परिस्थितीत 718 आणि 719 गुण मिळणे अशक्य आहे.
दरम्यान, या वादावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिले आहे. यात म्हंटले की, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला होता. याबाबत विद्यार्थ्यांनी एनटीएकडे वेळ कमी झाल्याची तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि त्यासंबंधीचे न्यायालयीन खटले लक्षात घेऊन उमेदवारांना भरपाई म्हणून ग्रेस मार्क देण्यात आले आहेत. यातील काही उमेदवारांसाठी नॉर्मलायजेशन फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. ग्रेस मार्क्स दिल्याने त्यांचे मार्क्स 718 किंवा 719 आले. या परीक्षेतील दुसरा आरोप केला जात आहे तो म्हणजे, एकाच परीक्षा केंद्रातून अनेक टॉपर्स आहेत. परीक्षेतील पहिल्या 100 विद्यार्थ्यांच्या यादीत एकच केंद्र असलेले 8 विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे.
या आरोपांनंतर आणि वादानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, तर काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आरोपानंतर शनिवारी केंद्रीय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्याकंन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी दिली.