Download App

मोदी सरकारने ‘इंडिया’ला कामकाजातून वगळल्याचा आरोप: विरोधकांनी ‘भारत’ला दिला नवा लाँग फॉर्म

नवी दिल्ली : मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिले आहे, असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटले आहे. (The opposition gave a new long form to ‘Bharat’, accusing the Modi government of excluding ‘India’ from the work)

यानंतर जयराम रमेश यांनी भारत या शब्दालाही नवीन लाँग फॉर्म सुचविला आहे. BHARAT—Bring Harmony, Amity, Reconciliation And Trust. असं त्यांनी म्हटलं आहे. हेच इंडिया आघाडीतील पक्षांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, मोदी इतिहासाचे विकृतीकरण करून इंडियाचे विभाजन करू शकतात. हा भारत आहे, ते राज्यांचे संघ आहे. पण आम्ही खचून जाणार नाही. शेवटी, इंडियातील पक्षांचे उद्दिष्ट काय आहे? तर BHARAT—Bring Harmony, Amity, Reconciliation And Trust अर्थात (सुसंवाद, सौहार्द, सलोखा आणि विश्वास)

‘INDIA’ला कामकाजातून वगळलं; राष्ट्रपती भवनातून सुरुवात : संविधानातही होणार दुरुस्ती?

काय घडतय नेमकं?

अनेक दिवसांपासून भाजपचे विविध नेते, खासदार, आमदार यांनी इंडिया ऐवजी भारतच म्हणावे अशी मागणी केली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार नरेश बन्सल यांनी इंडिया या शब्दाऐवजी भारत हाच शब्द वापरण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. त्यामुळे इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

काय म्हणाले जयराम रमेश?

म्हणजे ही बातमी खरोखर खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरसाठी नेहमीच्या ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ यांच्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये ‘इंडिया, म्हणजे भारत, राज्यांचा संघ असेल’ असे लिहिले आहे. पण आता या ‘राज्यांच्या गटावर’ही हल्ला होत आहे, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं !

विरोधकांच्या इंडिया आघाडीवर मोदींचा सर्जिकल स्ट्राईक :

सर्व विरोधकांनी मिळून ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीचे नाव जाहीर झाल्यापासून ‘इंडिया’ हा शब्द चर्चेत आहे. याच आघाडीच्या नावावरून भाजप नेते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. यामुळेही पंतप्रधान मोदींनी कामकाजातून इंडिया शब्द वगळायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. या अधिवेशनात संविधान दुरुस्ती करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Tags

follow us