Indian sprinter Avinash Sable : बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता. त्याचवेळी या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले त्याचे आई-वडील मात्र, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या बीडमधील एका छोट्याच्या खेड्यात शेतातमध्ये खुरपणीचं काम करत होते. 6 ऑगस्ट 2022 चा हा दिवस. (Avinash Sable) 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारातील या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता. पण अखेरच्या 500 मीटरमध्ये त्यानं असाकाही वेग वाढवला की जणू त्यानं केनियन धावपटंच्या घशातून रौप्य पदक हिसकावलं.
पुनित बालन ग्रुपच्या आरती पाटीलचे दैदिप्यमान यश; पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके
खडतर प्रवास
मायक्रो सेकंदांच्या अगदी काही फरकानं त्याचं सुवर्ण पदक हुकलं. पण तरीही त्यानं केलेली ही कामगिरी अभूतपूर्व आणि ऐतिहासिकच होती. हा तरुण म्हणजे भारताचा 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीतील धावपटू अविनाश साबळे. बरोबर दोन वर्षांनंतर पॅरिस ऑलिंपिकमध्ये धावण्यासाठी अविनाश सज्ज आहे. एवढंच नाही तर भारतीय ऑलिंपिकच्या चमूमध्ये पदकांची सर्वाधिक अपेक्षा असलेल्यांच्या यादीतही अविनाशचं नाव बरंच वर आहे. पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा अविनाशचा आजवरचा प्रवास हा शब्दशः खडतर असाच राहिला आहे. शाळेच्या कच्च्या रस्त्यांवरून अनवाणी धावण्यापासूनचा हा प्रवास पॅरिसच्या ट्रॅकपर्यंत पोहोचला आहे.
संघर्षाची जाणीव झाली
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या लहानशा गावी 13 सप्टेंबर 1994 रोजी अविनाशचा जन्म झाला. वैशाली आणि मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अविनाशनं अगदी बालपणापासून गरिबी आणि संघर्ष अनुभवला. वीट भट्टी कामगार असलेल्या आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणाला मात्र, कायम महत्त्व दिलं असं अविनाशनं, एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं होतं. तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या अविनाशला त्याला अगदी बागडण्याच्या वयात म्हणजे 5-6 वर्षांचा असतानाच आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली आणि ती त्याने कायम जपली आहे.
संघर्षाचं चीज
आई-वडिलांना वीट भट्टीवर कामासाठी जायचं असायचं. त्यामुळं सकाळी आम्ही उठाच्या आधीच आई आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि ते निघून जायचे. सकाळी ते दोघं गेल्यानंतर थेट रात्रीच आम्ही त्यांना पाहायचो. त्यामुळं ते घेत असलेल्या कष्टाची जाणीव होत होती, असं अविनाश सांगतो. त्यामुळं त्यांच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासूच अविनाशच्या मनात होतं. त्यासाठीच सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अपयश आल्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय अविनाशनं घेतला. त्यानंतर लष्करामुळंच पुन्हा अविनाशला नियतीनं पुन्हा एकदा शर्यतीच्या ट्रॅकवर परतता आलं.
इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत; भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा
धावत शाळेत जायचो
अविनाशला अगदी लहानपणापासूच धावायची सवय लागली होती. सुरुवातीला गरज म्हणून सुरू झालेल्या धावण्यानं नंतर अविनाशच्या जीवनात छंदाचं स्थान मिळवलं होतं. त्यामुळं मग सगळी कामं धावत करायला आवडायची असं अविनाश यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. अविनाश पहिल्या वर्गात होता तेव्हाची आठवण सांगताना अविनाश म्हणाला की, त्यावेळी माझी शाळा घरापासून अंदाजे 6-7 किलोमीटर अंतरावर होती. कधी कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून मी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावत जायचो. इतर मुलं पायी, सायकलवर जायचे, पण मला मात्र धावायला आवडायचं. तेव्हापासूनच धावायची आवड लागली, असं अविनाश सांगतो.
वर्गातल्या मुलाशी शर्यत
शाळेतल्या शिक्षकांनी प्रचंड मदत केल्याचंही अविनाश सांगतो. कुलकर्णी सर, तावरे सर अविनाशला त्यांच्या गाडीवरून शाळेत न्यायचे. वेळप्रसंगी अगदी कडेवर उचलून त्यांनी शाळेत नेल्याचंही अविनाश सांगतो. शाळेतल्या शिक्षकांनी माझं धावणं पाहून मोठ्या वर्गातल्या मुलाशी माझी शर्यत लावली. त्यात मी जिंकलो तेव्हा या क्रीडाप्रकारात लक्ष द्यावं म्हणून अविनाशच्या शिक्षकांनीही प्रयत्न केले.
पहिली स्पर्धा आणि 100 रुपयांचं बक्षीस
अविनाश लहानपणी शाळेत असताना अभ्यासातही चांगलाच हुशार होता. शाळेत त्याचा कायम पहिला-दुसरा नंबर यायचा. त्यामुळं शिक्षकांचं अविनाशवर विशेष प्रेम होतं. त्याची धावण्याची आवड आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशसाठी क्रीडा क्षेत्रात प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जीवनातल्या पहिल्या शर्यतीविषयी सांगताना अविनाश म्हणाला की, ‘प्राथमिक शाळेत असताना ओडते सर, मुटकुळे सर आणि तावरे सर मला रेससाठी घेऊन गेले होते. ती 500 मीटरची स्पर्धा होती आणि मी त्यावेळी 9 वर्षांचा होतो. ती माझी पहिली स्पर्धा होती असं अविनाश सांगतो.