तमिळनाडूच्या राजकारणातून (AIDMK) एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अंतर्गत वादाचा सामना करणाऱ्या ‘एआयएडीएमके’पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा एडापड्डी पलानीस्वामी यांच्याविरोधात बंड पुकारत AIADMK च्या तीन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांनी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) पक्षात प्रवेश केला आहे.
मरागतम कुमारवेल, जयकुमार आणि सत्यभामा अशी या तीन आमदारांची नावं आहेत. या तिन्ही आमदारांनी तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांच्याकडं आपले राजीनामे सुपूर्द केले असून, अध्यक्षांनी ते त्वरित मंजूरही केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सी.व्ही. शन्मुगम यांच्या नेतृत्वाखाली AIADMK च्या ३० आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’ सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर घडलेली ही घडामोड पलानीस्वामी यांच्यासाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
मुख्यमंत्रीपदाची सुत्र हाती घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच विजय स्टॅलिन यांच्या भेटीला, कारण काय?
राजीनामा दिलेले हे तिन्ही आमदार AIADMK च्या बंडखोर गटातील होते. विशेष म्हणजे, धारापुरम आणि पेरुंदुरई हे दोन्ही मतदारसंघ पश्चिम तामिळनाडूतील ‘कोंगु’ भागात येतात, जो AIADMK चा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्याला आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने सुरुंग लावला आहे. राजीनामा दिल्यानंतर लागलीच या तिन्ही नेत्यांनी टीव्हीके सरकारमधील मंत्री आधाव अर्जुन यांची भेट घेतली.
आमदार आणि त्यांचे मतदारसंघ:
मरागतम कुमारवेल: विधानसभा मतदारसंघ -मदुरंतकम
सत्यभामा: विधानसभा मतदारसंघ -धारापुरम
जयकुमार: विधानसभा मतदारसंघ -पेरुंदुरई
व्हीप धुडकावून दिला होता पाठिंबा
१३ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान AIADMK च्या २५ बंडखोर आमदारांनी पक्षाचा ‘व्हीप’ (अडचणीच्या वेळी पक्षादेश) धुडकावून मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारच्या बाजूने मतदान केले होते. आज राजीनामा दिलेले तिन्ही आमदार याच २५ बंडखोरांपैकी आहेत.
