Download App

देशात 2019 मध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने कंबर कसली आहे. भाजपने स्वबळावर 370 हून अधिक तर एनडीएने 400+ जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर इंडिया आघाडीला मर्यादित यश मिळणार असल्याचे चित्र आहे. (Top 5 MPs in India 2019 with the highest number of votes and the smallest number of votes)

आता कोणता पक्ष, किती जागांवर बाजी मारणार हे तर निकालानंतरच कळून येऊ शकेल. मात्र 2019 मध्ये देशात पाच मतदारसंघ असे होते जिथे भाजपच्या उमेदवारांनी रेकॉर्डब्रेक मते मिळवत एकहाती बाजी मारली होती. तर 50 हून अधिक मतदारसंघ असे होते जिथे भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी दीड लाख ते तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेतले होते. 100 हून अधिक मतदारसंघ असे होते जिथे भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांनी एक लाखांच्या आसपास मताधिक्य घेतले होते. दुसऱ्या बाजूला पाच मतदारसंघ असे होते जिथे अगदी काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. अगदी 150 ते 200 मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले होते.

सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 खासदार :

1. गुजरातमधील नवसारी मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळविणारे खासदार ठरले होते. ते तब्बल सहा लाख 89 हजार 668 मतांनी विजयी झाले होते. गत निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला मिळालेले हे सर्वाधिक मताधिक्य ठरले होते. त्यांनी काँग्रेसच्या धर्मेश पटेल यांचा पराभव केला होता.

2. करनाल मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय भाटिया यांनी 70 टक्क्यांहून अधिक मते घेत विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप शर्मा यांचा सहा लाख 56 हजार 142 मतांनी पराभव केला होता.

3. हरियाणातील फरिदाबाद मतदारसंघातून भाजपा उमेदवार कृष्णपाल गुर्जर यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अवतार भडाना यांच्यावर 6 लाख 38 हजार 239 मतांनी मात केली होती.

4. राजस्थानमधील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुभाष चंद्र बहेरिया यांनी काँग्रेसच्या रामपाल शर्मा यांचा 6 लाख 12 हजार मतांनी पराभव केला होता.

5. गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार रंजनबेन भट यांनीही पाच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. रंजनबेन यांनी काँग्रेसच्या प्रशांत पटेल यांचा 5 लाख 89 हजार मतांनी पराभव केला.

काठावरील मतांनी निवडून आलेले टॉप 5 खासदार :

१. उत्तर प्रदेशातील मच्छलीशेर येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बी. पी. सरोज उर्फ भोलेनाथ हे केवळ 181 मतांनी निवडून आले होते. त्यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार त्रिभुवन राम यांचा पराभव केला होता.

२. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपचे मोहम्मद फैजल हे 823 मतांनी निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हमदुल्ला सईद यांचा पराभव केला होता.

३. अंदमान निकोबारमधून काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा 1 हजार 407 मतांनी निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल जॉली यांचा पराभव केला होता.

४. बिहारच्या जहानाबाद येथून जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद 1 हजार 751 मतांनी निवडून आले होते त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार सुरेंद्र प्रसाद यादव यांचा पराभव केला होता.

५. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीचे इम्तियाज जलील हे 4 हजार 492 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. जलील यांना 3 लाख 89 हजार 42 तर खैरेंना 3 लाख 84 हजार 550 मते पडली होती.

follow us