अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण असं सध्या युद्ध सुरू आहे. (Iran) या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेले आहेत. त्यामुळे इराणचा संतापाचा पारा भडकला असून इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवला आहे. एकूण सहा देशात अमेरिकेच्या लष्कराची तळे आहेत. दुबईतील अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवताना दुबईतील इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी आखाती देशातील उड्डाणे थांबविली आहेत. त्यामुळे त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 99 टक्के बुकिंग रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाचा पुरता बोऱ्या वाजला आहे.
इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम हा विविध स्तरावर होताना पाहायला मिळत आहे, भारतातील भांडवली बाजारावर जसा याचा परिणाम झाला. तसा पर्यटन व्यवसाय यांच्यावर ही परिणाम दिसत आहे. परदेशात फिरायला जाणाऱ्या ९० %लोकांनी बुकिंग रद्द केले आहेत जगभरात सुरु असलेल्या घटनांमुळे पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याची माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे डायरेक्टर विश्वजीत पाटील यांनी दिली. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आजही असंख्य फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. काल रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील 100 उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
यातील 62 फ्लाइट्स येणारे होते आणि 42 फ्लाइट्स जाणारे होते. प्रवाशांना फ्लाइट्स रद्द करण्यात आल्याचे मेसेजही पाठवण्यात आले होते. मात्र, फ्लाइट्स रद्द झाल्याने शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला. अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत दुबईतील भारतीय नागरिकाने वस्तुस्थिती सांगितली आहे. सध्य दुबईतील स्थिती सर्वसामान्य असून कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. दुबईमध्ये जॉबसाठी गेलेल्या भारतीयांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र आम्ही सगळे सेफ आहोत, असं दुबईत राहणारे तानाजी गोरड यांनी सांगितलं. मक्कासाठी गेलेले नाशिकचे सुमारे 200 भाविक अडकले आहेत. जिद्दा विमानतळ बंद असल्याने अनेक जण अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.
इराणचा अमेरिकेच्या युद्धनौका अब्राहम लिंकनवर हल्ला; चार क्षेपणास्त्र डागले
वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीकडून गेलेले यात्रेकरु अडकले आहेत. नाशिकचे फारुक तांबोळी यांच्याकडून देखील गेलेले 35 जण मक्का मध्ये अडकून पडल्याचा दावा केला आहे. विमानतळ सुरू होत नाहीत तोपर्यंत काहीही सांगणे शक्य नसल्याचे तांबोळी यांचे म्हणणे आहे. मात्र सर्व यात्रेकरु सुरक्षित आहेत. अमेरिका इराण युद्धात होणाऱ्या हल्ल्यामुळे दुबईत जळगाव जिल्ह्यातील 31 नागरिक अडकले आहेत. विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील 31 जण गेले होते. पण युद्धामुळे हे सर्वजण दुबईत अडकून पडले आहेत. हल्ल्यामुळे दुबई येथून विमानसेवा बंद झाल्यामुळे सर्व जण अडकले आहेत. मात्र, हे सर्वजण हॉटेलात सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसापासून सततच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे दुबईतील पर्यटन स्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे. दुबईचं प्रशासन तसेच हॉटेल प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात असून हॉटेलमध्ये थांबण्याचं सांगण्यात आल्याची माहिती दुबईत अडकून पडलेले जळगावातील दुर्गेश चौधरी यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या रवी जाधव यांची कन्या जागृती जाधव दुबईत अडकली आहे. जागृती जाधव ही एमबीबीएससाठी दुबईला गेली होती. 1 मार्च रोजी ती भारतात येणार होती. मात्र, ऐनवेळी फ्लाईट रद्द झाल्याने ती दुबईत अडकली असून सध्या ती सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका सुमन नेटकेंसह 40 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दुबईत अडकलाय. सांगवीतील गायकवाड कुटुंबियातील 6 सदस्यांचा यात समावेश आहे. दुबईत अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं हा ग्रुप भारतात परतू शकला नाहीये. 25 फेब्रुवारीला पर्यटनासाठी गेलेला हा ग्रुप आज भारतात परतणार होता. मात्र दुबईतून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आलीये. त्यामुळं हा ग्रुप विमानांची उड्डाणे सुरु होईपर्यंत दुबईत अडकून राहणार आहेत. सध्या ते सुरक्षित स्थळी असले तरी दुबईवरील वाढते हल्ले पाहता, या सर्वांचे नातेवाईक चिंतेत आहेत. भारत सरकारने विशेष विमानांची सोय करुन अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी नातेवाईक करतायेत.
पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील दोन जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत. दुबईमध्ये सध्या निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यामुळे यांना परतीचा प्रवास करता आलेला नाही. या गंभीर परिस्थितीची माहिती शिवानंद दळगडे स्वतः व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या कुटुंबीयांना दिली आहे.
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन्हीही जोडपे सुरक्षित असल्याची माहिती आहे. न्यू दुबई भागात असलेल्या वसतिगृहात लातूर, धाराशिव, नाशिक, पुणे येथील 25 ते 30 विद्यार्थी अडकलेले आहेत. दुबईत रोबोटिक इंजिनिअरिंगसाठी गेलेली लातूरची विद्यार्थिनी नेहा मिसार हिने आम्ही सर्व सुरक्षित असल्याचं कळवलं आहे. मात्र युद्धाच्या परिस्थितीमुळे सर्वजण घाबरलेले आहेत, असं तिने सांगितले आहे. नेहा मिसार यांनी त्याच्या वसतिगृह जवळ असलेल्या परिस्थितीचे दोन व्हिडिओ पाठवले आहेत. तर पर्यटनासाठी गेलेले, राहुल कदम – लातूर, शुभम पवार – रेणापूर, सचिन पाटील – वलांडी, मनोज कोरे – निलंगा, स्वप्नील पानकुरे – किल्लारी, मच्छिंद्र सुडके – खुंटेगाव अशी दुबईत पर्यटनासाठी गेलेले नागरिकांची नावं आहेत.
