आग्रा : उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyay) यांच्या एका प्रसिद्धी स्टंटवरुन सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. एका शहीद जवानाची आई रडत असतानाच तिला मदतीचा चेक देताना आणि फोटो सेशन करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रसिद्धी स्टंटवरुन त्या मातेने ‘हे असले प्रदर्शन करु नका’ असे म्हणत उपाध्याय यांना झापलेलेही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाईचीही मागणी होत आहे. (publicity stunt by Yogendra Upadhyay, the cabinet minister in Uttar Pradesh)
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांचाही समावेश आहे. शुभम गुप्ता शहीद झाल्याची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी जात आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्यायही शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि मदत देण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आईला 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
मंत्री चेक सुपूर्द करत असताना कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई धायमोकलून रडत होती आणि लोक फोटो काढत होते. मात्र लोकांना फोटो काढताना पाहून शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई म्हणाली, माझ्यासाठी प्रदर्शन आयोजित करू नका, माझ्या प्रिय मुलाला माघारी बोलवा. माझे जग संपले. माझे सर्व काही संपले आहे. माझा मुलगा शुभम…”. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांच्याही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी या व्हिडीओवर म्हंटले की, ’27 वर्षीय शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या रडणाऱ्या आईला गिधाड जनता पक्षाचे मंत्री योगेंद्र उपाध्याय आणि गिधाड भाजपच्या लोकांना सांगण्यास भाग पाडले गेले. त्यांना माहीत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’ याशिवाय शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही या कृतीला बेशरम म्हटले आहे. शहीद मुलाची आई विनवणी करत आहे, मात्र मंत्री त्यांचा फोटो क्लिक करण्यात व्यस्त आहेत. हा कसला निर्लज्जपणा? शहीद कुटुंबीयांना शांततेत शोक करू देणार नाही का?
रणविजय सिंह यांनी लिहिले, ‘कॅप्टन शुभम गुप्ता दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. भाजप सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय 50 लाखांचा धनादेश घेऊन पोहोचले, पण एवढी मोठी रक्कम अशीच कशी काय द्यायची? फोटो आणि व्हिडिओ तर काढलेच पाहिजेत ना.
मिथिलेशधर यांनी लिहिले, ‘आग्राचे कॅप्टन शुभम गुप्ता देशाचे रक्षण करताना सीमेवर शहीद झाले. त्यांच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यांना उभेही राहता येत नव्हते, हे असले प्रदर्शन करण्यास त्या नको म्हणत आहेत. पण या निर्लज्ज नेत्यांना लाज वाटायला हवी. जबरदस्तीने चेक देऊन फोटो सेशन्स करून घेत आहेत. तर ‘सरकारमध्ये बसलेल्या प्रचारकांची असंवेदनशीलता पाहा. व्हिडिओमध्ये शहीदांची आई म्हणतेय- ‘हे प्रदर्शन करु नका भाऊ’ पण ते व्हिडिओ काढतच आहेत.
दरम्यान, या व्हिडीओनंतर रडणाऱ्या आईसमोर चेक घेऊन उभे असलेल्या आणि फोटो क्लिक करत असलेल्या मंत्र्याविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती चेकला हात देखील लावत नाही, असे असूनही मंत्री चेक घेऊन त्यांच्यासमोर उभे आहेत आणि त्यांचा फोटो क्लिक करत आहेत. हा व्हिडिओ असंवेदनशीलतेचा कळस मानला जात असून मंत्र्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.