Download App

अखिलेश यादवांना दुसरा झटका! विश्वासू शिलेदाराने ऐनवेळी सोडली साथ

Uttar Pradesh Politics : विधानसभा निवडणुकीनंतर समाजावादी पार्टीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नगरपालिका निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागलेल्या समाजवादी पार्टीला आज एकाच दिवसात दोन मोठे झटके बसले आहेत. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे आमदार दारासिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या घटना अखिलेश यादव यांच्यासाठी अडचणी निर्माण करणाऱ्या ठरू शकतात.

लोकसभा निवडणुकांच्या आधी अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशातील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेथे पोहोचण्याचा प्रयत्न सपा करत आहे. मात्र यामुळे त्यांचे गृहराज्य उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा भाजपाने घेतला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.

आझम खान यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले, रामपूर कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

भाजपाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीत आलेल्या दारासिंह यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. दारासिंह पु्न्हा भाजपात जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. भाजपाच्या तिकीटावर ते मऊ किंवा अन्य मतदारसंघातून निवडणुकीत उतरू शकतात अशीही चर्चा आहे.

दारासिंह यांनी बसपात सहभागी होत आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. 1996 आणि 2000 मध्ये दारासिंह राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2009 मध्ये त्यांनी बसपा तिकीटावर घोसी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. 2015 मध्ये त्यांनी बसपाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर 2017 मध्ये निवडणुकीत विजय मिळवला. 2022 च्या विधानसभा निवडणुकांनंतर दारासिंह हे स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर समाजवादी पार्टीत आले होते.

आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा 

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने आझम खान यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2019 मध्ये सपा नेते आझम खान यांच्यावर रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘देशात 8० कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स, देशासमोर सायबर सुरक्षेचे आव्हान; अश्विनी वैष्णव यांची माहिती

आझम खान यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. आझम खान सपा-बसपा युतीचे लोकसभा उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान आझम खान यांनी त्यांच्या एका जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Tags

follow us