Download App

अखिलेश यादवांना सर्वात मोठा धक्का : राज्यसभा मतदानाला काही मिनिटे बाकी असतानाच मुख्य प्रतोदांचा राजीनामा

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांसाठी आज (27 फेब्रुवारी) मतदान होणार आहे. यासाठी भाजपचे आठ तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार मैदानात आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे सात तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार निवडूव येऊ शकतात. मात्र भाजपने आठवी जागा जिंकण्यासाठीही जोर लावला आहे. तर समाजवादी पक्षापुढे आमदार फुटण्यापासून वाचविण्याचे मोठे आव्हान आहे.

अशातच या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मतदान सुरु होण्याला अवघे काही मिनिटे बाकी असतानाच आमदार मनोज कुमार पांडे यांनी पक्षाच्या मुख्य प्रतोदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मतदानासाठी व्हीप कोण बजावणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अखेरच्या क्षणी नवीन व्हीप नियुक्त करणेही जवळपास अशक्य समजले जात आहे. कारण नवीन प्रतोद नियुक्त केल्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्षांची परवानगी मिळणे गरजेचे असते. (Uttar Pradesh, MLA Manoj Kumar Pandey has resigned as the party’s chief Whip.)

प्रतोद का असतो महत्वाचा?

राज्यसभा निवडणूक मतदानासाठी गुप्त मतदान नसते, आमदारांना त्यांचे मत पक्षाच्या अधिकृत एजंटला दाखवून करावे लागते. एजंट हा व्हीपच्या आदेशाने नियुक्त केला जातो. तसेच व्हीपने आदेश दिलेल्या उमेदवारालाच आमदारांना मतदान करावे लागले. पण आता मुख्य प्रतोदांनीच राजीनामा दिल्याने मतदानासाठी नवीन व्हीप बजावता येईल का याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आता आमदारांच्या घोडेबाजार खुलेआम होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थिती :

देशभरातून रिक्त झालेल्या 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानंतर उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील 15 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या 15 जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार इथून भाजपचे सात आणि समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार विजयी होऊ शकतात. पण भाजपने अखेरच्या दिवशी आठवा उमेदवार रिंगणात उतरवर निवडणुकीत रंगत आणळी आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश

एका उमेदवाराला निवडूण येण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. तर सर्व आठ उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपला 296 मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे मित्रपक्षांचे मिळून सध्या 286 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आठवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 10 मते कमी पडत आहेत. तर समाजवादी पक्षाकडे अगदीच काठावरची म्हणजे 111 मते आहेत.

विधानसभेत सध्या भाजपचे 252 आमदार आहेत. तर अपना दलचे 13, राष्ट्रीय लोक दलाचे नऊ आमदार आहेत. यासोबतच निषाद पक्षाचे सहा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचेही सहा आमदार आहेत. म्हणजेच भाजपकडे एकूण 286 मते आहेत. याचाच अर्थ भाजपकडे आठव्या उमेदवारासाठी 27 मते आहेत, तर 37 मतांची आवश्यकता आहे.

Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’

सपाकडे किती मते आहेत?

समाजवादी पक्षाकडे तुरुंगात असलेल्या आमदारांसह 108 मते आहेत. तर काँग्रेसकडे दोन मते आहेत. त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी आणखी एका मताची गरज आहे. मात्र इथेही एक घोळ आहे. अपना दलच्या पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. सध्या त्या समाजवादी पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मत न दिल्यास आणि दोन मते कमी पडू शकतात. त्यासोबतच तुरुंगात असलेले आमदार आले नाहीत तर कदाचित चार मते कमी पडू शकतात. त्यामुळेच सध्या उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणूक रंगतदार बनली आहे.

follow us