Download App

मोठे स्टार, अमाप पैसा पण सट्टेबाजीला केलं प्रमोट.. ‘त्या’ सेलिब्रिटींचे उद्योग ईडीच्या रडारवर

ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींची चौकशी सुरू केली आहे.

Telangana News : विजय देवरकोंडा. राणा दग्गुबाती अन् प्रकाश राज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टतील ही सेलिब्रिटी नावं. पण आता हीच नावं वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. चित्रपटप्रेमींनी ज्यांना डोक्यावर घेतलं तीच ही मंडळी आता ईडीच्या कचाट्यात सापडली आहेत. तब्बल 29 सेलिब्रिटींमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. या लोकांची चौकशी ईडी करणार आहे. चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या या सेलिब्रिटींनी नेमकं केलं तरी काय? ईडीने याच लोकांना रडारवर घेण्याचं कारण काय? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या.. 

सेलिब्रिटी ईडीच्या कचाट्यात

या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याआधी ईडीने या लोकांची चौकशी का सुरू केली याची माहिती घेणं महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल. मियापूर येथील फणिंद्र शर्मा या व्यावसायिक व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी काही धक्कादायक बाबींचा खुलासा केला होता. बेकायदेशीर सट्टेबाजीच्या अॅप्समध्ये युवक आणि सर्वसामान्य नागरिक वाहवत चालले आहेत. लोकांनी हजारो कोट्यावधी रुपये या अॅप्समध्ये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अॅप्सचा प्रचार चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी करत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.

यानंतर सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 सेलिब्रिटींविरुद्ध एफआयआर दाखल केला. तेलंगाणा गेमिंग अॅक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार एफआयआर दाखल केला. त्यानंतर या प्रकरणात ईडीचीही एन्ट्री झाली. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कलाकारांना मिळालेले पैसे, आर्थिक देवाणघेवाणीची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे या सेलिब्रिटींविरुद्ध कायदेशीर कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत.

विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबाती.. 29 सेलेब्रिटी ED च्या कचाट्यात, गंभीर प्रकरणात कारवाई

आत या सेलिब्रिटी मंडळींनी नेमकं काय केलं होतं त्यांच्यावर ईडीने कारवाई का केली कोणत्या गोष्टी ईडीच्या एन्ट्रीसाठी कारणीभूत ठरल्या याची माहिती घेऊ या.. 

खरंतर या सेलिब्रिटी लोकांवर बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप्सचे प्रमोशन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने चौकशी सुरू केली आहे. ईडी सर्व सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इफ्लुएंसर्सची चौकशी करत आहे. किती पैशांच्या मोबदल्याच या अॅप्सचे प्रमोशन केले, पैसे कसे मिळाले आणि टॅक्स डिटेल्स काय आहेत याची माहिती घेतली जात आहे. या अॅप्सच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

आता थोडसं वेगळ्या अँगलने या गोष्टीचा विचार करु या म्हणजे, ही सेलिब्रिटी मंडळीसुद्धा पैसे मिळतील म्हणून काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला येईल. प्रकाश राज हे दक्षिण भारतातील चित्रपटातील मोठं नाव. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. प्रकाश राज चित्रपटात बहुधा खलनायकाच्या भूमिकेत दिसतात. त्यांचा हाच अंदाज लोकांना भावतो. हिंदी चित्रपटातही त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण हेच प्रकाश राज याआधीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.

प्रकाश राज यांना नोव्हेंबर 2023 मध्ये तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्स या कंपनीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या पोंझी आणि फसवणूक प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी समन्स बजावण्यात आले होते. प्रकाश राज हे या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. ईडीने 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रणव ज्वेलर्सवर छापे टाकले आणि 23.70 लाख रुपये रोख आणि 11.60 किलो सोन्याचे दागिने जप्त केले.

त्रिचीच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) ने दाखल केलेल्या FIR च्या आधारे तपास सुरू झाला ज्यामध्ये प्रणव ज्वेलर्सने गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या गुंतवणूक योजनेच्या नावाखाली 100 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. परंतु गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही. ईडीला संशय आहे की कंपनीने बनावट कंपन्यांमार्फत पैशांचा गैरवापर केला. प्रकाश राज यांना कंपनीकडून मिळालेल्या पेमेंट्स आणि आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मिळवण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते.

त्यानंतर आता जुलै 2025 मध्ये ईडीने प्रकाश राज यांच्यासह 29 सेलिब्रिटींवर बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप्सच्या प्रचाराशी संबंधित प्रकरणात कारवाई केली. सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या FIR च्या आधारे ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत तपास सुरू केला. या प्रकरणात विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, आणि इतर सेलिब्रिटींचाही समावेश आहे. प्रकाश राज यांनी 2016 मध्ये एका गेमिंग अॅपचा प्रचार केला होता, परंतु त्यांनी एका वर्षातच करार संपवला होता. कारण त्यांना ही जाहिरात नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून योग्य वाटली नाही. ईडीला संशय आहे की अशा जाहिरातींद्वारे मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेरी (मनी लाँड्रिंग) झाली असावी.

अभिनेता विजय देवरकोंडा यांनी A23 नावाच्या गेमिंग अॅपचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून प्रचार केला होता. या अॅपला कायदेशीर आणि स्किल बेस्ड गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रचारित केले गेले, परंतु ईडीला संशय आहे की अशा अॅप्सद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग झाले आहे. विजय देवरकोंडाच्या टीमने त्यांनी फक्त कौशल्य आधारीत गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चं प्रमोशन केलं होतं, जे 2023 मध्येचं संपलं आहे. त्यांचा कोणत्याही बेकायदेशीर अॅपशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

माजी पीएकडूनच आलियाच्या अकाउंटवर डल्ला! 76 लाखांच्या फसवणुकीसाठी वेदिका शेट्टीला अटक

कायदेशीर कार्यवाही नेमकी काय?

ईडीने या प्रकरणात PMLA अंतर्गत एक एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ECIR) दाखल केली आहे. यामध्ये विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज, आणि इतर सेलिब्रिटींची नावे समाविष्ट आहेत. FIR मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), तेलंगणा गेमिंग अॅक्ट, आणि IT अॅक्ट 2000 (66D कलम) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यात डिजिटल फसवणूक आणि बेकायदेशीर जुगाराला प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे.

follow us