Vinod Tawde BJP National Role : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी बाजूला पडलेले नाव आता भाजपच्या राष्ट्रीय संघटनेतील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक बनले आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महासचिवपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातचं त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार असल्याने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्याच्या राजकारणातून बाहेर पडल्यानंतर तावडेंचा 7 वर्षात राजकीय आलेख कसा वाढत गेला. त्याबद्दल जाणून घेऊया…
नितीन नबीन यांच्या नव्या टीमची घोषणा, भारती पवार, तावडे कुणा-कुणाला संधी
महाराष्ट्रातून ‘साइडलाइन’… पण तिथेच थांबले नाहीत
2014 ते 2019 या काळात तावडे फडणवीस सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडील खाती कमी करून आशिष शेलार यांना देण्यात आली होती. तसेच त्यांच्या बोरीवली मतदारसंघातूनही त्यांनी उमेदवारीही देण्यात आली नव्हती. त्यावेळी तावडे आणि फडणवीस यांच्यात राजकीय स्पर्धा असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. फडणवीसांनी तावडेंचे काही विभाग बदलले किंवा कमी केले, अशीही त्या काळातील राजकीय चर्चा होती.
मात्र, उमेदवारी नाकारल्यानंतर तावडेंनी बंडाचा मार्ग स्वीकारला नाही. उलट पक्ष संघटनेत काम करण्याची भूमिका स्वीकारत दिल्लीकडे मोर्चा वळवला. 2020 मध्ये त्यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद देण्यात आले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना भाजपचे राष्ट्रीय महासचिव करण्यात आले. हा त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा निर्णायक टप्पा ठरला. तावडे यांच्या पुनर्वस्नात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष जे पी यांचा मोठा वाटा होता. Abvp चे म्हणून दोघांमध्ये उत्तम स्नेह होता. जे पी नड्डा हे अध्यक्ष झाल्यानंतर तावडे यांना त्यांनी दिल्लीत बोलावून घेतले. नड्डा नसते तर, तावडे यांच्या पुनर्वसनास आणखीन विलंब लागला असता.Vinod Tawde BJP National Role
‘पद गेलं, पण नेटवर्क राहिलं’
तावडेंच्या राजकीय प्रवासातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संघटनात्मक नेटवर्क. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आलेल्या तावडेंना संघ-भाजपच्या संघटनात्मक पद्धतीचा दीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्रातील स्थानिक राजकारण, दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व आणि विविध राज्यांतील पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधण्याची क्षमता ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सक्रिय राजकारणातून ते दूर गेले असले तरी, त्यांचा राजकीय प्रभाव संपला नाही. उलट राष्ट्रीय संघटनेत काम करताना त्यांनी आपले संपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनाचे कौशल्य अधिक व्यापक केले.
हरियाणातून बिहारपर्यंत… तावडेंची ‘ट्रायल’
2020 मध्ये हरियाणाचे प्रभारी झाल्यानंतर तावडेंना राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक जबाबदारी हाताळण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2022 मध्ये त्यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी भाजपसमोर नितीश कुमार आणि राजद यांच्यातील राजकीय समीकरणाचे मोठे आव्हान होते.
बिहारमध्ये काम करताना तावडेंनी बूथ पातळीवरील संघटन, सामाजिक समीकरणे, मित्रपक्षांशी संवाद आणि निवडणूक रणनीती यावर लक्ष केंद्रित केले. 2023 मध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएत आल्यानंतर बिहारमध्ये सत्तेची समीकरणे बदलली. पुढे 2024 च्या लोकसभा आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या कामगिरीत तावडेंच्या संघटनात्मक भूमिकेची चर्चा झाली. त्यांच्या बिहारमधील कामगिरीमुळे राष्ट्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढल्याचे दिसून आले.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीतही ‘समन्वयक’ भूमिका
तावडेंच्या राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या महत्त्वाचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या उच्चस्तरीय निवडणूक जबाबदाऱ्या. 2022 मध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी एनडीएच्या निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध राज्यांतील पक्ष आणि समर्थकांमध्ये समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले.
त्यानंतर 2025 मध्ये सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. या दोन्ही घटनांमधून तावडे हे केवळ राज्य पातळीवरील नेते राहिलेले नसून, विविध पक्षांशी संवाद साधणारे राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक व्यवस्थापक म्हणून पुढे आल्याचे दिसते.
‘संघटन पर्व’पासून केंद्र सरकारच्या योजनांपर्यंत
तावडेंची ताकद केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही. भाजपच्या ‘संघटन पर्व 2024’ अंतर्गत राष्ट्रीय सदस्यता अभियानाचे नेतृत्व त्यांनी केले. पक्षाच्या देशव्यापी सदस्यता मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय ‘मन की बात’, ‘हर घर तिरंगा’, ‘चांद्रयान’, ‘मेरी माटी मेरा देश’ यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांच्या समन्वयातही त्यांचा सहभाग राहिला. ‘ऑपरेशन गंगा’दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि समन्वय साधण्याचे कामही त्यांनी केले. म्हणजेच, निवडणूक व्यवस्थापन + संघटन विस्तार + केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार + पक्षांतर्गत समन्वय अशी त्यांची राष्ट्रीय पातळीवरील भूमिका विस्तारत गेली.
फडणवीसांना मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा अधिकार; मंत्र्यांच्या निर्णयांवर परिणाम होणार?
आता थेट उत्तर प्रदेशची ‘परीक्षा’
आता भाजपने तावडेंना उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे. भाजपच्या दृष्टीने ही साधी संघटनात्मक नियुक्ती नाही. उत्तर प्रदेश हे लोकसभेच्या दृष्टीने देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे आणि 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी ते अत्यंत निर्णायक आहे. तावडेंना या जबाबदारीसोबत सहप्रभारी म्हणून जगदीश ईश्वरभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या राष्ट्रीय टीममध्ये 65 पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून त्यापैकी 51 नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. भाजपने पुढील विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल केल्याचे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तावडेंची यूपी नियुक्ती ही त्यांच्या ‘पुनरागमनाचा पुढचा टप्पा’ मानली जात आहे.
एका नजरेत तावडेंचा ‘पॉवर ट्रॅक’
2019 — महाराष्ट्रात उमेदवारी नाकारली
↓
2020 — हरियाणाचे प्रभारी
↓
2021 — भाजप राष्ट्रीय महासचिव
↓
2022 — बिहारचे प्रभारी
↓
2022 — राष्ट्रपती निवडणुकीतील महत्त्वाची जबाबदारी
↓
2024 — लोकसभा निवडणूक व्यवस्थापनातील भूमिका
↓
2025 — उपराष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन
↓
17 ऑगस्ट 2026 — राष्ट्रीय महासचिवपदी पुनर्नियुक्ती
↓
18 ऑगस्ट 2026 — उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती
तावडेंची ही नियुक्ती केवळ ‘पदवाढ’ नाही; महाराष्ट्राच्या राजकारणात बाजूला पडलेल्या एका नेत्याने राष्ट्रीय संघटनेत स्वतःची उपयुक्तता सिद्ध करत पुन्हा मिळवलेले वजन आहे. आता या वजनाची खरी परीक्षा उत्तर प्रदेशच्या 2027 विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
