प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राडा; संजय राऊत अन् आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात दाखल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 30T204209.870

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख (Purnekar) प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर आणत संशयितांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली असुन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचुन पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करत कुटुंबियांनी केलेल्या आरोपांची नोंद एफआयआरमध्ये करण्याची मागणी केली. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावं एफआयआरमध्ये नमुद करावीत, अशी मागणी राऊत यांनी केली असुन या दोघांवर कुटुंबियांनी आरोप केल्याचं त्यांनी सांगितलं.

म्हणूनच गणरायावर अंडी फेकण्याचं धाडस; आमदार जगतापांचा ठाकरेंवर प्रहार

पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर संजय राऊत यांनी या प्रकरणातील कथित सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी केली. मीनाक्षी शिंदे यांना पोलीस संरक्षण मिळाल्याचा आरोप करत त्यांचं नाव एफआयआरमध्ये नसल्यास न्याय मिळण्याबाबत शंका राहील, असं राऊत यांनी म्हटलं. तसंच राजेंद्र शिंदे यांचंही नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. पूर्णेकर यांच्या मुलाचा जबाब पुरवणी एफआयआरमध्ये जोडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला असुन पप्या शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं काम करत आहेत. या हत्येचा कट आधीपासुन रचला होता, तसेच काही व्यक्तींवर संशय असल्याचे आरोप कुटुंबियांनी केले आहेत, मात्र या आरोपांबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, संशयितांची नावं एफआयआरमध्ये समाविष्ट करुन तातडीने कारवाई करावी, या मागणीवर पूर्णेकर कुटुंबीय ठाम आहेत.

follow us