Download App

फडणवीसांनी तिकीट कापले… आता तेच तावडे होणार ‘भाजपचे’ बॉस?

विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे… महाराष्ट्रात भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्पर्धक असलेले सर्वच नेते पटावरुन बाजूला झाले होते. मुंडेंचा पराभव झाला. बावनकुळे अन् तावडेंचे तिकीट कापले गेले. तेव्हापासून अनेक दिवस हे तिन्ही नेते राजकीय वनवासात गेले. भाजपमध्ये राजकीय वनवास संपवायचा असेल तर हवा असतो संयम आणि जोडीला निष्ठा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वनवास संपायला 2022 उजाडावे लागले. त्यानंतर ते विधान परिषदेवर आमदार झाले आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षही झाले. पंकजा मुंडे यांनी संयम दाखवला, निष्ठा दाखवली पण जाहीरपणे भाष्य करायची त्यांनी एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळे कदाचित त्यांचा वनवास संपण्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक उजाडावी लागली. (Vinod Tawde’s name is in discussion as the National President of BJP.)

या दोघांच्याही तुनलेत विनोद तावडे यांचा वनवास लवकर संपला. त्यांची आधी भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली, नंतर राष्ट्रीय सरचिटणीस झाले. बिहार, चंदीगड इथले निवडणुकीचे इनचार्ज झाले. राजकीय वनवास संपवून पुन्हा केंद्रस्थानी येत तावडे यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. हेच तावडे आता भाजपचे बॉस होण्याच्या मार्गावर आहेत. भाजपचे विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पक्षाध्यक्ष म्हणून मुदत संपत आलेली आहे. शिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे नव्या पक्षाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. आतापर्यंत धर्मेद्र प्रधान, भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान अशा ज्येष्ठ नेत्यांची नावे अध्यक्ष म्हणून चर्चेत होती. पण यांचाही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण असणार? या माध्यमांमधील चर्चांमध्ये तावडे यांचे नाव समोर आले आहे.

भुजबळांच्या आनंदावर संशोधन करा अन् त्यांना काय हवयं ते एकदाचं देऊन टाका; शिससाटांनी कान टोचले

नवा होणारा राष्ट्रीय अध्यक्ष हा सहाजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील असणार हे तर नक्की. याशिवाय त्यांची देशभरातली राजकारणावर पकड पाहिजे. या समीकरणात सध्या भाजपचे देशपातळीवरुन चार नावे चर्चेत आली आहेत. यात सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथूर, के. लक्ष्मण नेत्यांचा विचार केला जात असल्याचे समजते. पाहुयात या चारही नेत्यांमध्ये नेमकी कोणाची काय स्ट्रेन्थ आहे. पक्षाध्यक्ष होण्यासाठी नेमके कोणाचे नाव आघाडीवर आहे…

सुनील बन्सल :

पक्षाध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव आहे ते सुनील बन्सल यांचे. बन्सल हे सध्या सरचिटणीस आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीतीच्या आखणीमध्ये अमित शहांसोबत काम केले आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आले होते. हे तिन्ही राज्ये भाजपसाठी अवघड मानली जात होती. पण त्यानंतरही त्यांनी या राज्यांत भाजपची कामगिरी उंचावली. ओडिशामध्ये तर भाजपने सत्ता काबीज केली. तेलंगणामध्येही गतवेळीपेक्षा खासदारांच्या संख्येत भर पडली आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने तगडी लढाई लढली आहे. त्यामुळे एक उत्तम रणनीतीकार म्हणून बन्सल यांच्याकडे बघितले जाते. संघाचे कार्यकर्ते अशी ओळख असलेले बन्सल भाजप आणि संघ यांच्यातील दुवा बनू शकतात.

आंबेडकरांकडून भाजपला नागाची तर, काँग्रेसला सापाची उपमा; म्हणाले, उत्तर देऊन थकलो

विनोद तावडे :

बन्सल यांच्यानंतर दुसरे नाव आघाडीवर आहे ते विनोद तावडेंचे. तावडे हे सध्या दुसरे सरचिटणीस आहेत. विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. ‘प्रवासी लोकसभा’ मोहिमेच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी तावडेंनी सांभाळली होती. चंडीगढ, हरियाणा आणि बिहार या राज्यांचे ते प्रभारी राहिले आहेत. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये प्रचार मोहिमेचे तावडे सह-समन्वयक होते. इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचेही ते प्रमुख आहेत. एकनाथ खडसे यांच्यासारख्या पक्षापासून लांब गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षाजवळ आणण्यातही तावडे यांचा हातखंड आहे. देशभरातील सनदी अधिकारी आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणून त्यांना निवडणूक मैदानात उतरविण्याच्या समितीची तावडे यांनीच जबाबदारी पार पाडली. थोडक्यात त्यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांचाही पक्षाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो.

ओम माथुर :

राजस्थानचे राज्यसभा सदस्य, भैरोसिंग शेखावत यांचे शिष्य आणि संघाचे प्रचारक ओम माथूर हे देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहेत. माथूर हे चेहऱ्यावरील हासू आणि मधाळ वाणीसाठी ओळखले जातात. अत्यंत शांत डोक्याच्या माथूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये प्रभारी पद सांभाळले होते. मोदींच्या अत्यंत विश्वासातील मानले जातात. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामागे माथूर यांचे कष्ट होते. त्यांनी वसुंधरा राजे गटाशी समन्वय साधण्याची कामगिरी पार पाडल्याचे सांगितले जाते.

के. लक्ष्मण :

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण यांचाही पक्षाध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो. यंदाच्या निवडणुकीत देशभर दलितांनी काँग्रेस व इंडिया आघाडीतील घटक पक्षांना मतदान केल्याचा फटका भाजपला बसला होता. याशिवाय लक्ष्मण तेलंगणातून येतात. हे तेच राज्य आहे जिथे भाजप आंध्र प्रदेशानंतर दक्षिणेकडे सर्वाधिक लक्ष देत आहे. लक्ष्मण हे तेलंगणा भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. आक्रमक होण्यासोबतच काम शांततेने करण्याची कलाही त्याच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us