रायपूर : गत सात दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या नावावरुन सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला असून विष्णू देव साय (Vishnu Dev Sai) हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. रमणसिंह, विजय बघेल, अरुण साव, ओ. पी. चौधरी या सर्व चर्चेतील नावांना बाजूला सारुन भाजपने धक्कातंत्राचा वापर करत आश्चर्यकारकरित्या साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. भाजपच्या (BJP) विधिमंडळ बैठकीत त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. (Vishnu Dev Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh.)
यावेळी भाजपचे नवनिर्वाचित 54 आमदार, राज्याचे प्रभारी ओम माथूर, केंद्रीय मंत्री, निवडणूक सहप्रभारी डॉ. मनसुख मांडविया, भाजपचे संघटनेचे सहप्रभारी नितीन नबीन, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नियुक्त केलेले निरीक्षक केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम आदी नेते उपस्थित होते.
गत रविवारी (3 डिसेंबर) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात तीन राज्यात भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपने मध्य प्रदेश तर राखलेच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले. छत्तीसगडमध्ये भाजपने 54 जागांवर आघाडी घेत काँग्रेसला धूळ चारली.
भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सात दिवसांपासून दिल्लीत आणि राज्यात मोठ्या प्रमाणात खलबत सुरु होती. अखेरीस आज सर्व प्रभारी आणि निरीक्षकांच्या बैठकीनंतर दुपारी 12 वाजता भाजपच्या सर्व 54 आमदारांना प्रदेश कार्यालयात पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुपारी २ वाजता भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.
विष्णू देव साय कुंकरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यांच्या रुपाने छत्तीसगडमध्ये भाजपने आदिवासी कार्ड खेळल्याची चर्चा आहे. छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32 टक्के आहे. विष्णुदेव साय हे त्यांच्या साधेपणासाठीही ओळखले जातात. साय रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदारही होते. ते पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते.