ममता बॅनर्जींना मोठा धक्का; तृणमूलचे माजी खासदार भाजपमध्ये, कोण आहेत हे नेते?

West Bengal Politic-गुरुवारी सुष्मिता देव, सुखेंदु शेखर रॉय आणि प्रकाश चिक बराईक यांनी भाजपात प्रवेश केला.

Mamata Banerjee

Mamata Banerjee

West Bengal Politic: पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सत्तांतर झाल्यापासून तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. वीस खासदार फुटल्यानंतर माजी राज्यसभा खासदारांनी साथ सोडली आहे.

गुरुवारी सुष्मिता देव, सुखेंदु शेखर रॉय आणि प्रकाश चिक बराईक यांनी भाजपात प्रवेश केला. कोलकात्यातील साल्ट लेक येथील भाजप कार्यालयात पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला आहे. हे तिघेही यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत प्रतिनिधित्व करत होते. राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचाही राजीनामा दिला होता. समिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि पश्चिम बंगालच्या विकासाच्या अपेक्षेमुळे या तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की, “आजपासून सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बराईक यांची एकमेव ओळख म्हणजे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “तृणमूल काँग्रेससाठी आमचे दरवाजे बंद आहेत. जनतेची लूट करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही.”

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांनी सांगितले की, पक्षाने सुखेंदु शेखर रॉय यांना पक्षात येण्यापूर्वी कधीही न मिळालेल्या राजकीय संधी दिल्या होत्या. 2011 पूर्वी सुखेंदु शेखर रॉय कधीही खासदार किंवा आमदार नव्हते. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा सन्मान राखत त्यांना राज्यसभेत पाठवले. आज ते भाजपमध्ये गेले आहेत. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्ष सोडला नव्हता. जनता सर्व काही पाहत आहे.

तिघांनी गेल्या महिन्यात दिला होता राजीनामा
या तिन्ही नेत्यांनी गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्ष सोडल्यानंतर सुष्मिता देव यांनी सांगितले होते की, त्यांचा निर्णय राजकीय आणि वैयक्तिक अशा दोन्ही कारणांमुळे घेतला आहे. त्या म्हणाल्या होत्या, “मी TMC का सोडली, यामागे मोठी कथा आहे. मला दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये राहायचे नव्हते. ममता दीदींबद्दल मी कोणतीही टिप्पणी करणार नाही. माझे राजकीय आणि वैयक्तिक असे दोन्ही कारणे होती. स्वतंत्र देशात प्रत्येक राजकारण्याला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. बंगालच्या जनतेची मी आभारी आहे, पण मला आता आसाममध्ये काम करायचे आहे.”

सुखेंदु शेखर रॉय यांचा टीएमसीवर निशाणा
राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुखेंदु शेखर रॉय हे सुरुवातीच्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाच्या कामकाजावर टीका करत तृणमूलच्या निवडणुकीतील पराभवाला दीर्घकाळ चालत आलेले गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. आर. जी. कर रुग्णालय प्रकरणाच्या काळात राजीनामा दिला असता स्वतःला लक्ष्य केले गेले असते, असा दावाही त्यांनी केला होता. मी राज्यसभेच्या सभापतींना भेटून माझा राजीनामा दिला. तसेच ममता बॅनर्जी यांना व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे पक्ष सोडण्याचा निर्णय कळवला. माझा राज्यसभेचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, मात्र पक्षात राहणे माझ्यासाठी शक्य नव्हते, असे सुखेंदू शेखर रॉय यांनी स्पष्ट केले होते.

प्रकाश चिक बराईक यांचाही राजीनामा

सुष्मिता देव आणि सुखेंदु शेखर रॉय यांच्यानंतर प्रकाश चिक बराईक यांनीही राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीबाबतच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.


ममता बॅनर्जींचा पलटवार

बंडखोर गटाने आपणच खरे तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केला आहे. काँग्रेससोबत विलिनीकरणाच्या शक्यतेलाही नकार दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांनी पक्षाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, भाजपमध्ये गेलेल्या आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या टीएमसी नेत्यांना जनता माफ करणार नाही.

Exit mobile version