Western culture drugs, alcohol, multiple partners Kangana Ranaut controversial statement regarding Gen-Z women : भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे वादाला तोंड फोडले आहे. NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रील्सवर टीका करत तिने Gen Z तरुण-तरुणींवर वादग्रस्त शब्दांत निशाणा साधला आहे.
‘ही पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली’
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये कंगना रनौतने म्हटले की, ही पिढी पाश्चात्त्य संस्कृतीने प्रभावित झाली आहे. समाजाला किंवा व्यवस्थेला देण्यासारखे यांच्याकडे फारसे काही नाही. अभ्यासातही ते विशेष प्रगती करत नाहीत आणि त्यांच्या विचारसरणीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पुढे तिने असा दावाही केला की, काही तरुण व्यसन, मद्यपान आणि अनियंत्रित जीवनशैलीला स्वातंत्र्याचे प्रतीक समजतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. तसेच अनेक जण स्वतःच्या पायावर उभे न राहता पालकांच्या उत्पन्नावर अवलंबून असूनही स्वतंत्र असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
स्वतंत्र महिलेबाबत मांडले मत
कंगना रनौतने विशेषतः तरुण महिलांच्या संदर्भातही आपले मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, खऱ्या अर्थाने स्वतंत्र महिला तीच असते जी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते, स्वतःच्या कर्तृत्वावर करिअर घडवते आणि आपल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी स्वीकारते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मेहनत आणि जबाबदारी आवश्यक असते. जबाबदारी न स्वीकारता केवळ स्वतंत्र असल्याचा आव आणणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
व्हायरल रील्सवरही नाराजी
यापूर्वीही कंगना रनौतने जंतर-मंतर येथे CJPच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील व्हायरल रील्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ती म्हणाली की, “मी आयुष्यात एकाच ठिकाणी इतकी नकारात्मकता पाहिलेली नाही. या आंदोलनाशी संबंधित रील्स पाहिल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. त्यामध्ये वापरली जाणारी भाषा आणि बोलण्याची शैली अतिशय आक्षेपार्ह आहे.”
यासोबतच त्यांनी आंदोलनातील काही घोषणांवर आणि स्वतःला “कॉकरोच” असे संबोधण्याच्या प्रकारावरही टीका केली. अशा प्रकारच्या वर्तनामुळे समाजासमोर चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रकारच्या व्हिडिओंमुळे “डिजिटल डिटॉक्स करण्याची गरज वाटते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.कंगना रणौत यांच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या विधानांवर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
