Iran-US Israel War Affected World Economy : इराणमध्ये रक्ताचा सडा, अमेरिकेचा रिकामा होत असलेला खजिना आणि इस्रायलमधील विद्ध्वंस… या तीन देशांच्या युद्धात अख्खे जग होरपळून निघाले आहे. 1973 च्या तेल संकटाची आठवण करून देणाऱ्या या संघर्षाने 54.88 लाख कोटी रुपयांचे जागतिक नुकसान केले आहे. अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, युद्धविरामानंतरही हा विनाशाचा वणवा शांत झालेला नाही. जगाची धाकधूक वाढवणाऱ्या या महायुद्धाच्या परिणामांचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
60 सेकंदांत पाकड्यांची अब्रू गेली; ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला, पण शरीफ दणक्यात ‘एक्स्पोज’ झाले
सर्वाधिक फटका इराणला
या महायुद्धाची सर्वात मोठी आणि भीषण किंमत इराणला मोजावी लागत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या शक्तीशाली क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांनी इराणला केवळ मानवी स्तरावरच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीच्या बाबतीत, इराणमध्ये आतापर्यंत 7,300 हून अधिक मृत्यू आणि 25,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शाळा, रुग्णालये आणि ऐतिहासिक इमारतींचे पूर्णपणे अवशेष झाले आहेत. जर हे युद्ध थांबले नाही, तर इराणचा जीडीपी 10 टक्क्यांहून अधिक घटू शकतो, ज्यामुळे हा देश अनेक दशके मागे जाईल असा गंभीर इशारा चॅथम हाऊसच्या एका अहवालातून देण्यात आलाय. त्यामुळे हे युद्ध इराणसाठी केवळ लष्करी संघर्ष नसून, एका संपूर्ण राष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा विनाश करणारा ठरलं आहे. Iran-US Israel War Affected World Economy
युद्धामुळे अमेरिकेचे किती नुकसान झाले?
आता युद्धाचे मुख्य रणमैदान जरी इराणची भूमी असली, तरी या महासंघर्षाची झळ महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही तितक्याच तीव्रतेने सोसावी लागत आहे. लष्करी मोहिमा आणि सामग्रीच्या खर्चामुळे अमेरिकेचा खजिना झपाट्याने रिकामा होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
CSIS म्हणजेच Center for Strategic and International Studies च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेला या युद्धात आतापर्यंत 7.49 लाख कोटी रुपयांचा म्हणजेच 80.4 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. एवढेच नव्हे तर, जर हा संघर्ष पुन्हा असाच सुरू राहिला आणि ऊर्जा बाजारपेठा व व्यापारातील व्यत्यय कायम राहिला, तर अमेरिकेचे नुकसान 210 अब्ज डॉलर्स म्हणजेच 19.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Iran US War : ‘शस्त्रसंधी’ची घोषणा फायदेशीर ठरली…कच्चा तेलाच्या किमती घटल्या अन् शेअर बाजारात तेजी…
इस्रायलचे किती नुकसान झाले?
इराणच्या हल्ल्यांची मोठी किंमत इस्रायललाही मोजावी लागत आहे. आतापर्यंत या ज्यू राष्ट्रात 33,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 7 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराण आणि लेबनॉन यांच्यासोबत सुरू असलेल्या युद्धात इस्रायलचे अंदाजे 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
आखाती देशांच्या नुकसानीचा हिशोब
कुवेत आणि कतार : अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धाची किंमत केवळ इराणच नव्हे, तर त्याचे शेजारील अरब देशही चुकवत आहेत. या युद्धाची झळ त्यांनाही बसत आहे. जर हे युद्ध एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालू राहिले, तर कुवेत आणि कतार या देशांचा जीडीपी 14 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो असा अंदाज आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, या हल्ल्यांमुळे कुवेत आणि कतार या दोन्ही देशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. या देशांवरील हल्ल्यांमुळे येथील पिण्याच्या पाण्यापैकी 99 टक्के पाण्याचे क्षारविरहितीकरण प्रकल्प धोक्यात आले आहेत. तसेच एलएनजी प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.
युएई आणि सौदी अरेबिया : युद्धामुळे सौदी अरेबियाच्या जीडीपीमध्ये 3 % घट होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे, तर विमानतळे, बंदरे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे युएईच्या जीडीपीमध्ये 5 % घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तेल उत्पादनातही कपात केली जात असून, एकट्या युएईच्या शेअर बाजाराला 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
इराक : अमेरिका-इस्रायल युद्धामुळे इराकमधील तेलक्षेत्रांतील उत्पादनात 70 टक्क्यांनी घट झाली असून, त्यामुळे इराकी अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव आला आहे. याशिवाय बहरीन, सौदी अरेबिया, ओमान आणि जॉर्डन या देशांमध्ये अनेक लोक ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे येथील तेलाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
लेबनॉन : युद्धात इराणला पाठिंबा दिल्याची किंमत लेबनॉनलाही मोजावी लागत असून, आतापर्यंत 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 4,639 जण जखमी झाले आहेत. 10 लाखांहून अधिक लोकांना आपली घरे सोडून पलायन केले असून, युद्धामुळे लेबनॉनला 14 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज आहे.
बहुप्रतिक्षित ‘डेलॉइट इंडिया टॅलेंट आऊटलूक 2026 रिपोर्ट आला; यंदा किती टक्के वाढणार तुमचा पगार?
युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम?
अमेरिका-इराण युद्धाचा भारतावर थेट परिणाम होत नसला तरी, त्याचे आर्थिक परिणाम प्रत्येक भारतीयाच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर नक्कीच पोहोचत आहेत. कारण युद्ध सुरू झाल्यापासून शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे अंदाजे 37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विविध वृत्तांनुसार, अनेक राज्यांमध्ये एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. भारत सरकारने जरी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची मोठी कपात जाहीर केली असून, ही कपात वर्षभर कायम राहिल्यास सरकारला सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.
US-Israel-Iran : दोन आठवड्यांचा ‘युद्ध’विराम, पण दोन्ही देशांत नेमकं काय ठरलंय?
युद्धाचा उर्वरित जगावर काय परिणाम होणार?
इराण-अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, जग 1973 च्या तेल संकटापेक्षाही वाईट परिस्थितीत सापडले आहे. पाकिस्तानमध्ये शाळा बंद करत अनेकांना इंधन कपातीमुळे घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, श्रीलंकेत तेलाची बचत करण्यासाठी प्रत्येक बुधवार सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे.फिलीपिन्समध्ये राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनियर यांनी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली तर, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चीनने इंधन निर्यातीवर संपूर्ण बंदी घातली.
या युद्धामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलच नव्हे, तर इतर अनेक गोष्टी महाग झाल्या. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत असून, येणाऱ्या काळात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत. जगाला लागणाऱ्या एकूण ‘नॅफ्था’ पैकी 60 % नॅफ्था याच युद्धग्रस्त भागातून येतो. त्यामुळे प्लास्टिकच्या निर्मितीसाठी लागणारे ‘एथिलीन’ 35 टक्क्यांनी महागले आहे.
गुजरातसारख्या मोठ्या वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये कच्च्या मालाचा खर्च 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वाढती इंधन आणि वीज विक्री यामुळे Dyeing, Bleaching आणि फिनिशिंगच्या कामांचा खर्च प्रचंड वाढला आहे. तर, पेट्रोकेमिकल्सवर आधारित असल्याने पॉलिस्टरच्या किमती 15 टक्क्यांनी वधारल्या आहेत. त्यामुळे इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील हा संघर्ष तूर्तास युद्धविरामामुळे थांबलेला दिसत असला, तरी या युद्धाने मागे सोडलेले विनाशाचे व्रण दशकानुदशके पुसले जाणार नाहीत. 55 लाख कोटींच्या धुरात केवळ अर्थव्यवस्थाच भस्मसात झाली नाही, तर लाखो लोकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
