Sensor Tower Report On Mobile App Downloding : तुम्ही शेवटचं असं कोणतं अॅप होतं जे मोबाईलमध्ये डाउनलोड केला होतं? साहजिकच उत्तर असेल इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा एखादा गेम. पण, समोर आलेल्या माहितीनुसार आता भारतीयांच्या आवडीनिवडी वेगाने बदलत आहेत. आपण स्मार्टफोनचा वापर नेमका कशासाठी करतोय, याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एका बाजूला AI अॅप्सचा तुफान बोलबाला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे सोशल मीडिया अॅप्सच्या डाऊनलोडमध्ये चक्क घट झाली आहे. नेमकं काय बदललंय भारताचं डिजिटल विश्व? आणि लोक मोबाईलवर सध्या काय शोधताहेत? त्याबद्दल जाणून घेऊया…
रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर आलं?
सेंसर टावरच्या ताज्या रिपोर्टनुसार, 2025 या वर्षभरात भारतात जनरेटिव्ह AI अॅप्सच्या डाऊनलोडमध्ये तब्बल 205 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजे विचार करा, तिप्पट पटीने AI अॅप्स युजर्सच्या फोनमध्ये डाऊनलोड झाले आहेत. ChatGPT सारख्या अॅप्सने हे सिद्ध करून दाखवलंय की, आता AI ही केवळ तंत्रज्ञांची मक्तेदारी राहिलेली नाही, तर सामान्यांच्या जगण्याचा भाग बनली आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ करायचा असो, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ईमेल लिहायचा असो किंवा काही नवीन आयडिया शोधायच्या असोत प्रत्येकजण मदतीसाठी AI कडे धाव घेत आहे. जरी प्रत्येकाने या अॅप्सचा नियमित वापर केला नसला, तरी प्रत्येकाच्या फोनमध्ये एकतरी AI अॅप आज आवर्जून डाऊनलोड झालेला दिसून येत आहे.
आता तुम्ही म्हणाल की, फक्त काम किंवा अभ्यास नाही, तर मनोरंजनाच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. मीडिया आणि एंटरटेनमेंट अॅप्सच्या डाऊनलोडमध्येदेखील 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. यातही सर्वात जास्त क्रेझ आहे ती ‘शॉर्ट ड्रामा’ आणि छोट्या भागांच्या कथांची. आजकाल लोकांकडे तासं-तास सिनेमे पाहायला वेळ नाही, त्यामुळे कमी वेळात खणखणीत मनोरंजन देणाऱ्या अशा छोट्या-छोट्या एपिसोड्सच्या अॅप्सना तरुण वर्गाकडून तुफान पसंती मिळत आहे.
इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप डाऊनलोड घटले
आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की, ज्या सोशल मीडियाशिवाय आपले पान हलत नाही, त्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया अॅप्सचे डाऊनलोड 17 टक्क्यांनी का घटले? तर, याचा अर्थ सोशल मीडियाची क्रेझ संपली असा अजिबात नाही. उलट हे अॅप्स आधीपासूनच प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले असतात, त्यामुळे हे अॅप्स नव्याने डाउनलोडची गरज भासत नाही. लोक जुनेच अॅप्स वापरत आहेत, पण नवे डाऊनलोड्स थोडे मंदावले आहेत.
या सगळ्या बदलांमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे एज्युकेशन आणि जॉब अॅप्सच्या डाऊनलोडमध्ये 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा की, लोक आता स्मार्टफोनचा वापर नवीन स्किल्स शिकण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी देखील गंभीरपणे करत आहेत. थोडक्यात काय तर, आपल्या हातातला फोन आता फक्त टाईमपासचे साधन राहिलेला नाही, तर तो एक स्मार्ट असिस्टंट बनला आहे.
