Arvind Kejriwal : दिल्ली दारु धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज (2 नोव्हेंबर) केजरीवाल यांना चौकशीला हजर रहायचे होते. मात्र, या प्रकरणात केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या समन्सला केराची टोपली दाखवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ईडीने पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित आहे. भाजपाच्या सांगण्यावरूनच ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मला चार राज्यांत निवडणूक प्रचारासाठी जाता येऊ नये, यासाठीच ही नोटीस पाठविण्यात आल्याचे केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून प्रत्युत्तर दिले. ईडीने ही नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. मात्र आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक होणार का? असा सवाल विचारला जात आहे. (Will Arvind Kejriwal be arrested for not appearing for questioning as per ED summons)
अरविंद केजरीवाल आज हजर न झाल्याने ईडीकडे कोणता पर्याय उरला आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? याबाबत समजून घेऊ.
अंमलबजावणी संचालनालय अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवू शकते. एखाद्या व्यक्तीने तीन वेळा ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर ईडी न्यायालयात धाव घेते. यानंतर ईडीकडून अजामीनपात्र वॉरंटची मागणी केली जाते. अजामीनपात्र वॉरंट हा न्यायालयाचा आदेश असतो. त्या ठराविक वेळी आणि तारखेला हजर राहणे आवश्यक असते. जर कोणी अजामीनपात्र वॉरंटचे पालन केले नाही तर त्यांना अटक केली जाऊ शकते आणि नंतर न्यायालयात हजर केले जाते.
अरविंद केजरीवाल समन्सला आव्हान देण्यासाठी आणि अटकपूर्व जामिनाची मागणी करण्यासाठी सत्र न्यायालयात जाऊ शकतात. तिथे त्यांना दिलासा न मिळाल्यास ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. तिथेही त्यांना दिलासा न मिळाल्यास त्यांना चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा ईडीकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आप सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आधीपासूनच तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार संजय सिंह यांच्या घरीही ईडीने छापा टाकला होता. चौकशीनंतर त्यांनाही अटक करण्यात आली. सध्या ते कोठडीतच होते. यानंतर थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनाच समन्स बजावण्यात आले. त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, केजरीवाल ईडीला पत्र पाठवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणा चौकशी करत आहे. या प्रकरणात एप्रिल महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी केजरीवाल यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए अधिनियमानुसार समन्स बजाविण्यात आले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांचा जबाब ईडी घेणार असल्याचे बोलले जात होते