ED Raids : दिल्ली सरकारचा आणखी एक मंत्री ‘ईडी’च्या कचाट्यात; तब्बल 9 ठिकाणी छापेमारी
ED Raids : राजधानी दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण घोटाळ्यातील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावले. त्यानंतर सत्ताधारी आम आदमी पार्टीचा आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात (ED Raids) सापडला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. ईडीने मंत्री राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित 9 ठिकाणी छापेमारी केली. छापा टाकण्यामागे काय कारण आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. या कारवाईनंतर मंत्री आनंद यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
#WATCH | ED raid underway at the residence of Delhi Minister Raaj Kumar Anand in Civil Lines area. Searches started early morning today. Raids are underway at 9 premises linked to him. Details awaited pic.twitter.com/2Q0ZuFIjGo
— ANI (@ANI) November 2, 2023
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आप सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आधीपासूनच तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार संजय सिंह यांच्या घरीही ईडीने छापा टाकला होता. चौकशीनंतर त्यांनाही अटक करण्यात आली. सध्या ते कोठडीतच होते. यानंतर थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनाच समन्स बजावण्यात आले. आता केजरीवाल यांचीही ईडीचे अधिकारी चौकशी करतील. या घडामोडी घडत असतानाच आणखी एक मंत्री राजकुमार आनंद ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत.
ईडीच्या या कारवाईनंतर आप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. छापेमारी करून नेत्यांना अटक करून पक्ष संपविण्याचे कारस्थान सरकारकडून केले जात असल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणात ईडी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकही करू शकते, अशी भीती आप नेत्या अतिशी मार्लेना यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांनी भाजपविरोधात सातत्याने भूमिका घेतली. त्यांना जर अटक झाली तर त्यांच्या या भूमिकेविरोधात झालेली ही कारवाई असेल, असेही त्यांनी सांगितले होते.
Rahul Gandhi : ‘हॅकिंगला घाबरत नाही, अदानींनी माझा फोन न्यावा’; राहुल गांधींचं चॅलेंज!
आज केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी
ईडीने (ED) केजरीवाल यांना नोटीस काढत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आज 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे अटकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार आम आदमी पक्षाचा आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणा चौकशी करत आहे. या प्रकरणात एप्रिल महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी केजरीवाल यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए अधिनियमानुसार समन्स बजाविण्यात आले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांचा जबाब ईडी घेणार असल्याचे बोलले जात आहे.