Tej Pratap Yadav form a new party? बिहार म्हटलं की दोन चेहरे डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे लालूप्रसाद यादव (LaluPrasad Yadav) आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार. या दोघांनीच बिहारवर सत्ता गाजविली. आता दोघांमध्ये बिहार विधानसभा (Bihar Assembly Election) निवडणुकीवरून पुन्हा रणसंग्राम होईल. पण त्याचपूर्वी लालूंच्या घरातच एक वादळ आलंय. त्यांचा मुलगा, माजी मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav )यांची लव्ह स्टोरी समोर आली. ही लव्ह स्टोरी समोर आल्यानंतर संतापलेल्या लालू प्रसाद यांनी तेजप्रताप यांना पक्षातून निलंबित केलं. तसेच कुटुंबापासून दूर केले. या कारवाईमुळे लालू यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. लग्न झालेले तेजप्रताप यांची लव्ह स्टोरी काय आहे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या तेजप्रताप यांच्यासमोर राजकीय पर्याय आहेत. हे बघुया..
तेजप्रताप यांचे पहिले लग्न आणि लव्हस्टोरी
तेजप्रताप हे लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आहे. ते बिहारचे माजी आरोग्यमंत्री राहिलेत. पण ते अनेकदा वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेत. त्यांच्या वागणुकीमुळे लालू यादव यांनी पक्षाची सर्व सूत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर दिलीय. तो निर्णय तेजप्रताप यांना आवडला नव्हता. पण विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आलीय. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक होऊ शकते. आरजेडीकडून निवडणुकीची जोरदार तयार सुरू आहे. त्याचवेळी तेजप्रताप यादव एक बॉम्ब टाकतात. त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पडते. त्यात तेजप्रताप यादव हे अनुष्का यादव हिच्याबरोबर आपले बारा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे जाहीर करतात.
पण तिथे तेजप्रताप हे चुकतात. कारण तेजप्रताप यांचा पहिला विवाह एेश्वर्या राय यांच्याबरोबर झालाय. परंतु दोघांच्या संसारात कटुता आली असून, दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु कोर्टाने अजून या घटस्फोटाला मंजुरी दिलेली नाही. त्यापूर्वीच त्यांनी प्रेमसंबंध जाहीर करून कायदेशीर लचांड अंगावर ओढून घेतलंय. परंतु त्यानंतर त्यांनी सावरासावर करत माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले. मुलाचा हा निर्णय लालू प्रसादांना आवडला नाही. त्यांनी लगेच एक ट्वीट करत तेजप्रताप यांना घरातून आणि पक्षातून काढून टाकले.
तेजप्रताप यादव किती कोटींचे मालक ?
मागील विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यादव यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यांची एकूण मालमत्ता 3.58 कोटी इतकी आहे. त्याच्याकडे अनेक जंगम आणि अचल मालमत्ता आहेत. एक बीएमडब्ल्यू सेडान, एक स्कोडा स्लाविया, एक होंडा सीबीआर 1000 आरआर सुपरबाईक यांचा समावेश आहे. गोपाळगंज जिल्ह्यातील फुलवारिया आणि पटना येथेही त्यांची शेती आणि निवासी जमीन आहे.
निवडणुकीत फटका बसू शकतो ?
खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. त्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. आतापासून त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकतो, असे लालू यादव यांचे ट्वीट आहे. विरोधकांकडून हे प्रकरण आता उचलण्यात आलाय. निवडणुकीत या मुद्द्यावरून आरजेडी बॅकफूटला जाईल. मोठ्या भावाच्या लव्ह स्टोरीचा इफेक्ट तेजस्वी यादव यांच्या राजकारणाला बसेल. पक्षाला कोणताही धोका होऊ नये म्हणून लालू यादव यांनी मुलाची पक्षातून निलंबित केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तेजप्रताप हे आमदार राहू शकतील का ?
याचा तेजप्रताप यांच्या राजकारणााला मोठा फटका बसू शकतो. तेजप्रताप हे हसनपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. पण सध्या तरी त्यांची आमदारकी जाणार नाही. तेजप्रताप यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी आरजेडीला विधानसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी करावी लागेल. त्यानंतर सदस्यत्व रद्द होईल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हे होणार नाही. परंतु आगामी निवडणुकीत त्यांना आता राष्ट्रीय जनता दल म्हणजे आरजेडीकडून तिकीट मिळणार नाही. अशा परिस्थितीत त्यांना अपक्ष लढावे लागेल किंवा स्वत:चा पक्ष काढावा लागेल. पण स्वतःचा पक्ष काढण्याएेवढी त्यांची क्षमता नाही. तसेच त्यांना दुसरा पक्ष जवळ करणार नाही. आपले प्रेम सार्वजनिक रित्या जाहीर करून तेजप्रताप यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून तर घेतलाच, पण विरोधकांना आयते कोलित देत वडिल लालूप्रसाद व लहान भाऊ तेजस्वीची कोंडी केलीय.