आरोग्य भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती… महाराष्ट्रासह देशभरातील स्पर्धा परीक्षा वादात सापडत असतानाच आता मुलांना डॉक्टर बनवणारी प्रवेश परीक्षाही वादात सापडली आहे. मागच्या काही दिवसांपासून NEET UG परीक्षेच्या निकालावरुन संपूर्ण देशात सुरु असलेला राडा पाहता ही परीक्षा पुन्हा होणार का? असा सवाल विचारला जात आहे. यापूर्वी मे महिन्यातही NEET UG चे पेपर सुरु असताना अनेक ठिकाणाहून पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. तेव्हाही अनेक विद्यार्थ्यांनी पेपर पुन्हा घेण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी त्याची दखल घेतली गेली नव्हती. आता निकाल हाती आल्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. मात्र, ही परीक्षा पुन्हा होणार की नाही याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही.
2015 पर्यंत देशात MBBS, BDS प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर AIPMT अर्थात ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट होती. सीबीएसईकडून ही परीक्षा घेतली जायची. याशिवाय प्रत्येक कॉलेजच्या, स्टेटच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा होत्या. पण केंद्र सरकारने 2015 मध्ये वैद्यकीय प्रवेशात सुसूत्रता आणली. राष्ट्रीय पातळीवर एकच वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात NEET UG लागू केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली. ही परीक्षा ऑफलाईन होत असते. एकूण 720 गुणांची ही परीक्षा असते. यंदा या परीक्षेला सुमारे 24 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 लाखांहून अधिक उत्तीर्ण झाले. परीक्षेत यंदा तब्बल 67 मुले टॉपर ठरली आहेत. या सर्वांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. तर काहींना 718, 719 पर्यंत गुण मिळाले आहेत.
मग वाद कुठे सुरु झाला?
गतवर्षीपर्यंत किमान 630, 640 पर्यंत गुण मिळावे म्हणून विद्यार्थी जीवतोड मेहनत करायचे, मात्र त्याच परीक्षेत यंदा अनेकांना 720, 719, 718 असे गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परीक्षेशी संबंघित तज्ज्ञ मंडळींच्या मते, NEET परीक्षेत 719 आणि 718 गुण मिळणे अशक्य आहे. कारण प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एका गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असते. विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडवल्यास त्याला 720 पैकी 720 गुण मिळतात. एक प्रश्न राहिल्यास 716 तर दोन राहिल्यास 712 गुण मिळतात. जर त्याने एक प्रश्न चुकीचा सोडवला, तर चार अधिक एक असे पाच गुण कापले जातात. अशा परिस्थितीत 718 आणि 719 गुण मिळणे अशक्य आहे.
दरम्यान, या वादावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिले आहे. यात म्हंटले की, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला होता. याबाबत विद्यार्थ्यांनी एनटीएकडे वेळ कमी झाल्याची तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि त्यासंबंधीचे न्यायालयीन खटले लक्षात घेऊन उमेदवारांना भरपाई म्हणून ग्रेस मार्क देण्यात आले आहेत. यातील काही उमेदवारांसाठी नॉर्मलायजेशन फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. ग्रेस मार्क्स दिल्याने त्यांचे मार्क्स 718 किंवा 719 आले. या परीक्षेतील दुसरा आरोप केला जात आहे तो म्हणजे, एकाच परीक्षा केंद्रातून अनेक टॉपर्स आहेत. परीक्षेतील पहिल्या 100 विद्यार्थ्यांच्या यादीत एकच केंद्र असलेले 8 विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे.
या आरोपांनंतर आणि वादानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, तर काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेमका काय निर्णय घेते, आरोग्य मंत्रालय या वादात हस्तक्षेप करते का? की सर्वोच्च न्यायालय विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.