तामिळनाडू विधानसभा निकालांनी दिला हंग असेंब्लीचा कौल; विजय विरोधात पारंपरिक विरोध पक्ष येणार एकत्र?

विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेले यश हे केवळ निवडणूक निकाल नसून, राज्यातील पारंपरिक राजकारणाला दिलेले मोठे आव्हान मानले जात आहे.

Untitled Design 84

Untitled Design 84

Will traditional opposition parties come together against Vijay? : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेले यश हे केवळ निवडणूक निकाल नसून, राज्यातील पारंपरिक राजकारणाला दिलेले मोठे आव्हान मानले जात आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने थेट सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचत, डीएमके-एआयडीएमकेसारख्या दशकांपासून रुजलेल्या पक्षांना धक्का दिला आहे.

मात्र, या मोठ्या यशानंतर देखील सत्तेचा मार्ग अजूनही खडतर आहे. तामिळनाडू विधानसभेतील 234 जागांपैकी 118 जागांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक असताना, टीव्हीके सध्या 107 या आकड्यावर साथोरवण्याची शक्यता आहे. विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला असल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद एका जागेने घटणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय पर्याय उरात नाही.

विजय यांनी तत्परता दाखवत काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र मिळवले आणि राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला. मात्र, राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की केवळ पत्र नव्हे, तर प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता नंबर गेम अधिकच निर्णायक ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य आघाडी. गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांविरोधात लढणारे हे दोन पक्ष आता विजय यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जर ही आघाडी प्रत्यक्षात आली, तर तामिळनाडूच्या राजकारणात तो ऐतिहासिक आणि धक्कादायक टप्पा ठरेल.

सरकारचा मोठा निर्णय! भारतात खेळण्याची पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी

दरम्यान डीएमके आणि एआयडीएमके यांची एकत्रित ताकद सध्या 106 आमदारांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्यांना देखील बहुमतासाठी इतर लहान पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. यामध्ये पीएमके, आययूएमएल, अपक्ष आणि इतर छोटे पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात. दरम्यान, टीव्हीकेने देखील आपले पर्याय खुले ठेवले आहेत. काँग्रेसव्यतिरिक्त व्हीएसके, डावे पक्ष आणि इंडियन मुस्लिम लीग यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, डाव्या पक्षांनी आणि आययूएमएलने स्पष्ट नकार दिल्यामुळे विजय यांची गणिते काहीशी बिघडली आहेत. व्हिसिकेने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने त्यांच्या नैर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याची परिस्थिती हंग असेम्ब्लीची आहे आणि अशा वेळी राजकीय वाटाघाटी, तडजोडी आणि धोरणात्मक निर्णय यांना प्रचंड महत्व प्राप्त होते. विजय यांच्यासाठी ही केवळ लोकप्रियतेची नव्हे, तर राजकीय कौशल्याची देखील खरी परीक्षा ठरणार आहे. चित्रपटसृष्टीतील करिष्मा राजकारणात कितपत परिणामकारक ठरतो हे पुढील दिवसांत स्पष्ट होईल.

दुसरीकडे, डीएमके-एआयडीएमके युतीची शक्यता जरी राजकीयदृष्ट्या अनैसर्गिक वाटत असली, तरी सत्तेचा अंकगणित हा विचार अशा आघाड्यांना जन्म देऊ शकतो. तामिळनाडूत पूर्वी देखील अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत आणि सध्याची परिस्थिती देखील तितकीच अनिश्चित आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यात कोण मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. विजय स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत असताना, विरोधी आघाड्यांकडून देखील पर्यायी नेतृत्व पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरीत, तामिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड अस्थिरता, उत्सुकता आणि रणनीतीचा खेळ सुरू आहे. जनतेने दिलेला कौल स्पष्ट असला, तरी सत्तेचा अंतिम निर्णय मात्रअजूनही अनिश्चिततेच्या धुक्यात दडलेला आहे. पुढील काही दिवस तामिळनाडूसाठी निर्णायक ठरणार असून, प्रत्येक हालचालीकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version