Pune Crime News: सध्या सगळीकडे रॅपरचा जमाना आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठात एका तरुणाने रॅप गाण्याचं (Pune Rapper) शुटींग केलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो पण म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत’ अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, गेले काही दिवस महाराष्ट्रातील तरुण मुले व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका करणारी रॅप गाणी तयार करत असून या मुलांवर गुन्हे दाखल करणे, पोलीस स्टेशनला बसवून ठेवणे, कुटुंबियांना घाबरवणे असे प्रकार पोलिसांकडून सुरु आहेत. या तरुणांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी उभा आहे, असे पाटील यांनी सांगितले.
अजितदादा भाजपात जाणार का ? ; आंबेडकर म्हणाले, पंधरा दिवस थांबा राज्यात..
ते पुढं म्हणाले की, एखादा शब्द अश्लील आहे कि नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो पण म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत.
पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर एका तरुणांने अश्लील शब्द असलेले गाणे गायले होते. या रॅप गाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर पोलीसांनी या रॅपरला चौकशीसाठी बोलवले होते. या प्रकारणात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली होती.
असेच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ’50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन’ असे रॅप रचून ते गाणाऱ्या राज मुंगासे याला पोलीसांनी अटक केली होती.