उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Shinde) यांनी लातुरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे. 2023 मध्ये पक्षात आलेले माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह त्यांचे अनेक समर्थकही पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले आहेत.
पाटील, सोमवंशी यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. विनायक पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने लातूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठ्या अपेक्षा आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विनायक पाटील यांनी पक्षांतराची हॅट्र्रीक केली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून विनायकराव जाधव पाटील हे 1999, 2014 असे दोन वेळा अपक्ष निवडून आले होते.
नितेश राणेंना चिखलफेक प्रकरण भोवलं, न्यायालयाने सुनावली 1 महिना कारावास, 1 लाख दंडाची शिक्षा
2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. 2024 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार होते. पुन्हा त्यांचा राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला. अपक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आता शिंदेच्या शिवसेनेतून विनायक पाटील यांची ही आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोलले जात आहे.
पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जाते. अहमदपूरचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासाठी हा प्रवेश डोकेदुखी ठरू शकतो. विनायकराव पाटील हे पहिल्यांदा 1999 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते.
विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा ते अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पक्षाने त्यांना अहमदपूरमधून उमेदवारीही दिली, पण पक्षांतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला आणि ते पराभूत झाले. भाजपातील दोन बंडखोर उमेदवार निवडणुकीत उतरल्याने विनायक पाटील यांची विजयाची हॅट्रीक हुकली होती.
