दादांचा ‘राजापूर’चा तो शब्द आता पूर्ण होणार? सुनेत्राताईंच्या विश्वासातील नावामुळे दिग्गज धास्तावले!
MLC Election साठी NCP कडून अनेक नावं चर्चेत असून, कोकणातून एका अभ्यासू आणि सुनेत्रा पवारांच्या विश्वासू व्यक्तीचे नाव चर्चेत
Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) निष्ठावंतांना संधी देण्याची चर्चा सुरू असतानाच, कोकणातून एक धक्कादायक पण चर्चेत असलेले नाव समोर येत आहे. ते नाव म्हणजे रत्नागिरीचे अभ्यासू नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज अजित रमेश यशवंतराव यांचे.
सुनेत्राताईंचे विश्वासू आणि दादांचे कट्टर समर्थक
अजित यशवंतराव यांची ओळख केवळ एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, तर पवार कुटुंबाचे, विशेषतः सुनेत्रा पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आहे. 2019 आणि 2022 मध्ये जेव्हा जेव्हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय बंडाची भूमिका घेतली, तेव्हा यशवंतराव खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या या निष्ठेचे फळ आता त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीच्या रूपाने मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Vidhan Parishad Election
2019 चा ‘राजपूर’चा पेच
अजित यशवंतराव यांच्यावर दादांचा किती विश्वास होता याचे उदाहरण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले होते. त्यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांनी यशवंतराव यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, ऐनवेळी प्रकृती बिघडल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे त्यावेळी राहिलेला अनुशेष आता विधान परिषदेच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिलेला शब्द मागे घेतलेला नाही, कोल्हेंच्या विधानपरिषद उमेदवारीबाबत बावनकुळेंचे सूचक संकेत
सहकार क्षेत्रातील दबदबा
केवळ राजकारणच नव्हे तर सहकार क्षेत्रातही यशवंतराव यांचा मोठा अनुभव आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेची नस ओळखली. त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे रत्नागिरी आणि कोकणात त्यांचा एक स्वतंत्र वलय असलेला गट आहे.
यशवंतराव यांच्या उमेदवारीची चर्चा का?
1. कोकणात पक्षविस्तार : तटकरे यांच्यानंतर कोकणात राष्ट्रवादीला (अजित पवार गट) अधिक बळकट करण्यासाठी यशवंतराव यांच्यासारख्या अभ्यासू चेहऱ्याची गरज आहे.
2. निष्ठावंतांचा सन्मान : संकटाच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्याला संधी देऊन राष्ट्रवादीला पक्षात सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश.
3. सहकार आणि संघटन : सहकार क्षेत्रातील पकड आणि सर्वसमावेशक स्वभाव यामुळे अजित यशवंतराव यांना सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळू शकतो.
जगदीश मुळीक यांचं राजकीय पुनर्वसन होणार? विधान परिषदेच्या यादीतील नावानं चर्चा रंगल्या
इतर प्रमुख दावेदार आणि राजकीय समीकरणे
अजित यशवंतराव यांच्यासोबतच पक्षातील इतरही अनुभवी आणि तरुण नेत्यांची नावे विधान परिषदेसाठी चर्चेच्या वर्तुळात आहेत. यामध्ये वांद्रे पूर्वचे आमदार आणि तरुण चेहरा असलेले जिशान सिद्दिकी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि अजित पवारांचे खंदे समर्थक दिगंबर दुर्गाडे त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि एक आक्रमक वक्ता म्हणून आनंद परांजपे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
तसेच सुनील तटकरे यांचे पुत्र आणि विधान परिषदेतील अनुभवी सदस्य असलेल्या अनिकेत तटकरे यांचेदेखील नाव चर्चेत असून, पक्षाचे प्रवक्ते आणि आक्रमकपणे बाजू मांडणारे नेते उमेश पाटील, मराठवाड्यातील संजय दौंड आणि सुरेश बिराजदार यांच्यादेखील नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे गोंदिया-भंडाऱ्यातून प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी असलेल्या राजेंद्र जैन यांचेदेखील नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Maharashtra Politics : विधान परिषदेच्या इच्छुकांमध्ये शिंदेंच्या गोटात बच्चू कडूंचे नाव कसं आलं?
निष्ठावंत की नवीन समीकरण?
अजित यशवंतराव यांच्यासह पक्षातील अनेक नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत. एका बाजूला अजित यशवंतराव यांच्यासारखे ‘संकट काळातील सोबती’ आहेत, तर दुसरीकडे प्रादेशिक आणि जातीय समीकरणे जुळवणारे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर उमेदवाराची निवड सोपी नसेल.
येत्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषदेच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल यात काही शंका नाही. पण, यासाठी सुनेत्रा पवारांच्या विश्वासातील यशवंतराव यांना संधी देऊन कोकणातील ‘पवारनिष्ठ’ कार्यकर्त्याला ताकद देण्याचा प्रयत्न होणार की, इतर नेत्यांना संधी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे महायुतीसह विरोधकांचेही डोळे लागले आहेत.