दिलेला शब्द मागे घेतलेला नाही, कोल्हेंच्या विधानपरिषद उमेदवारीबाबत बावनकुळेंचे सूचक संकेत
भाजपकडील संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीपर्यंत जाऊन पुन्हा मुंबईत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Big warning from Bawankule from Shirdi : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच पार पडणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निश्चितीची चुरस सुरू झाली आहे. भाजपकडील संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीपर्यंत जाऊन पुन्हा मुंबईत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अहिल्यानगर जाळ्यातून भाजपचा पाचवा आमदार निश्चित होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी दौऱ्यात केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
शिर्डीत माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी विवेक कोल्हे यांना विधान परिषद देण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते आणि तो शब्द अजूनही कायम आहे. त्यांच्या या विधानामुळे कोल्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मनाली जात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान विवेक यांनी माघार घेतली होती. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा निर्णय झाला होता. कोल्हे यांच्या या भूमिकेचे फडणवीस यांनी देखील कौतुक केले होते.
सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
निवडणुकीनंतर कोल्हे यांनी शांतता राखत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवली आहे. मात्र, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांच्या राजकीय संघर्ष कायम आहे. आगामी काळात जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लक्षात घेऊन कोल्हे यांनी तयारी सुरू केली आहे. विधान परिषदेत संधी मिळाल्यास त्यांच्या राजकीय बळात अधिक भर पडणार असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत देखील बावनकुळे यांनी भाष्य केले. साईबाबांच्या आशीर्वादाने सर्व प्रक्रिया मार्गी लागली असून, मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.