Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले. संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांपैकी 9 जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली असून, उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी उमेदवारांची माघार घडवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी चार जागांसाठी स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.
रणबीर कपूरही होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; घराची रेकी केल्याची माहिती
बिनविरोध झालेल्या नऊ जागांमध्ये राहाता मतदारसंघातून माजी खासदार डॉ. सुजय विखे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख, शेवगावमधून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, कोपरगावमधून बिपीन कोल्हे, श्रीरामपूरमधून नगराध्यक्ष करण ससाणे, संगमनेरमधून रणजित देशमुख, नगरमधून आमदार अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांचा समावेश आहे. या जागा बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटांमध्ये सहमती झाल्याचे चित्र आहे.
आता उर्वरित 12 जागांसाठी तीन गटांमध्ये लढत रंगण्याची शक्यता आहे. विखे-थोरात यांची युती, राम शिंदे यांचा स्वतंत्र गट आणि खासदार नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी अशी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. सोसायटी मतदारसंघातील अकोले, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, कर्जत आणि जामखेड या जागांसह महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती या प्रवर्गांतील जागांसाठी मतदान होणार आहे.
निवडणूक टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू असताना राम शिंदे यांनी कर्जत, जामखेडसह आणखी दोन जागा देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचा दावा केला. त्यानुसार बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. मात्र, युतीमध्ये आपल्याला स्थान मिळणार की नाही, याबाबत संभ्रम असल्याने पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे यांनी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळाले आहेत.
सहकारी बँकेतून भाजपच्या प्रचाराचे फोन?, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार संचालकपदावर सलग दहा वर्षे राहण्याच्या मर्यादेमुळे बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर आणि माजी संचालक अंबादास पिसाळ यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. घुले यांनी पत्नी राजश्री यांची उमेदवारी कायम ठेवल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. गायकर यांनी अकोले मतदारसंघातून माघार घेत मुलगी संजीवनी शिंदे यांच्यासाठी मार्ग मोकळा केला, तर पिसाळ यांनी कर्जतमधून माघार घेत मुलगा तुषार पिसाळ यांची उमेदवारी कायम ठेवली.
राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पुढील काही महिन्यांत देशात मोठ्या घडामोडींचे भाकीत
अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवार, सूचक, अनुमोदक आणि समर्थकांची निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. अधिकाधिक उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी विखे पिता-पुत्र, बाळासाहेब थोरात आणि आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले. मात्र, सर्व जागा बिनविरोध करण्याचे गणित जुळू शकले नाही. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी विविध राजकीय गटांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
