Ajit Pawar On Nitin Patil : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी नितीन पाटील (Nitin Patil) यांना मी जूनमध्ये खासदार करणार जर त्यांना खासदार केलं नाहीतर मी पवारांच्या औलाद सांगणार नाही असं देखील अजित पवार म्हणाले.
सातारा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून यावेळी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सातारा लोकसभा जागा जिंकण्यासाठी महायुतीकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.
या सभेत बोलताना ” यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना वाई-महाबळेश्वर-खंडाळा या भागातून एक लाखांचं मताधिक्य द्या, जूनमध्ये मी नितीन पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांच्या औलाद सांगणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. यानंतर सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात चांगलेच राजकारण तापलं आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून देत आहे. या निवडणुकीत देखील तुम्ही महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना निवडून द्या. जूनमध्ये मी नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो, जिल्ह्यात दोन खासदार झाल्यानंतर तुमची कामं व्हायला मदत होईल अशी साद देखील त्यांनी यावेळी सभेत बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यामुळे साताऱ्यात या लोकसभा निवडणुकीत अजित पवार की शरद पवार कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.