Download App

दोन पंडित पुन्हा एकमेकांविरोधात? लक्ष्मण पवारांना पंकजा मुंडेंचा पराभव नडणार?

गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरसिंह पंडित विरुद्ध शिवसेनेच्या बदामराव पंडित यांच्यात लढत होणार

  • Written By: Last Updated:

बीड लोकसभा मतदारसंघात (Beed) यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी गुलाल उधळला. त्यांनी भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा तब्बल 7 हजार मतांनी पराभव केला. सोनवणे यांच्या या विजयात बीड आणि गेवराई या दोन विधानसभा मतदारसंघांचा वाटा मोठा होता. बीडमधून 62 हजारांच लीड मिळाले होते. या पाठोपाठ गेवराई मतदारसंघातून सोनवणे यांना तब्बल 39 हजार मतांची आघाडी आहे. या आघाडीमुळे गेवराई मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचीही गणिते बदलली आहे. सलग दोनवेळा विजय मिळविलेल्या भाजपच्या लक्ष्मण पवार यांना तिकीट मिळणार की नाही आणि मिळाले तर निवडूण येणार की नाही याचे टेन्शन आहे. याच मताधिक्याने पंडित कुटुंबाच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. (Amar Singh Pandit will contest against Badamrao Pandit in Georai Assembly constituency)

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरिजमधून जाणून घेऊयात गेवराई मतदारसंघातील गणित…

गेवराई विधानसभा मतदारसंघावर 1962 पासूनच पंडित कुटुंब यांचे वर्चस्व राहिले आहे. 1962 साली सयाजीराव पंडित यांनी पहिल्यांदा आमदारकी खेचून आणली. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी कायद्याचे शिक्षण घेत असलेले शिवाजीराव पंडित गेवराईला आले होते. त्यावेळी सयाजीराव यांच्या विजयानंतर शिवाजीराव यांनीही राजकारणात एन्ट्री घेतली. धोंडराई गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत ते विजयी झाले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, सहा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. या दरम्यान ते 1967 सालची विधानसभा निवडणूक लढले. पण भाकपच्या शाहुराव पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

1972 च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा केज मतदारसंघ राखीव झाला होता. त्यामुळे त्यांनी गेवराईकडे मोर्चा वळवला. गोदावरी आणि सिंदफणेच्या कुशीतील गेवराईची सिंचनाच्या दृष्टीने समृध्द तालुका अशी ओळख आहे. अगदी त्याकाळी देखील शेतकऱ्यांना ऊसासारख्या नगदी पिकाचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे शाहु पवार आणि शिवाजीराव पंडित यांनी मतदारसंघात साखर कारखाना उभा रहावा, भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून सोळंके यांना गेवराईमधून बिनविरोध निवडून दिले.

Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर

1978 साली शिवाजीराव पंडित यांनी आमदारकी खेचून आणली. पंडित यांनी आमदार झाल्यानंतर अख्ख्या तालुक्याच्या राजकारणावर दबदबा तयार केला. पण 1980 मध्ये शाहुराव पवार यांचे पुत्र माधवराव पवार यांनी पंडित यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पंडित यांचा अवघ्या 157 मतांनी पराभव झाला. पंडित यांनी पुढच्याच निवडणुकीत या पराभवाचे उट्टे काढले. 1985 सालच्या निवडणुकीत त्यांनी माधवराव पवार यांचा 15 हजार मतांनी पराभव केला. 1990 सालीही पंडितच विजयी झाले.

शिवाजीराव पंडित यांनी साधारण 20 वर्षे जिल्हा परिषदेवर पकड ठेवली. मंत्रीमंडळात विविध महत्वांच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. विद्युत मंडळाचे सदस्य, राज्य गृह वित्त महामंडळाचे संचालक अशा पदांवरही काम केले. पक्षीय संघटनेतही त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य पदांवरही त्यांनी काम केले. राजकारणात सर्वाधिक काळ शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवाजीराव पंडित यांनी एस. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेतही पवारांची साथ दिली.

पण 1992 मध्ये पंडित घराण्यात उभी फूट पडली. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवाजीरावांचे सुपुत्र अमरसिंह आणि चुलत भाऊ बदामराव असे दोघेही जिल्हा परिषदेवर निवडून आले. मात्र दोघांपैकी पंचायत समितीचे सभापती कोणाला करायचे यावरुन वाद सुरु झाला. तेव्हापासूनच बदामराव पंडित शिवाजीरावांपासून दुरावलेच. खरंतर अमरसिंह पंडित यांच्या राजकीय प्रवेशापूर्वी पंडित विरुद्ध पवार असा वाद होता. पण  1992 पासून पंडित घरातच कुरघोडीचे राजकारण सुरु झाले.

त्यानंतर 1995 मध्ये बदामराव पंडित यांनी शिवाजीरावांविरोधात बंडखोरी केली. शिवाजीराव काँग्रेसकडून तर बदामराव अपक्ष उभे राहिले. यात बदामराव पंडित भारी पडले. शिवाजीरावांचा तब्बल 31 हजारांच्य मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर शिवाजीराव पंडित यांनी राजकारणात निवृत्ती घेत मुलगा अमरसिंह पंडित यांना वारस म्हणून जाहीर केले. 1999 मध्ये अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. तर बदामराव पंडित हे अपक्ष रिंगणात उतरले आणि लढत काका-पुतण्यामध्येच झाली. बदामराव पंडित हे 68 हजार 937 मते घेऊन विजयी झाले. तर अमरसिंह पंडित यांना 50 हजार 272 मध्ये मिळाली होती. अपक्ष निवडून आलेले बदामराव पंडित हे राष्ट्रवादीत गेले. तर अमरसिंह पंडित यांनी भाजपची वाट धरली.

2004 ची निवडणूकही काका-पुतण्यामध्येच झाली. त्यावेळी मात्र पुतण्या अमरसिंह पंडित हे काका बदामराव पंडित यांच्यावर भारी पडले. अमरसिंह पंडित यांना 80 हजार 414 मते मिळाली होती. तर बदामराव पंडित यांना 63 हजार 814 मते मिळाली. 2009 मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. गेवराई तालुका, माजलगाव, बीड तालुक्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला. 2009 ची निवडणुकही दोघांमध्येच झाली. त्यावेळी मात्र बदामराव पंडित यांनी पुतण्या अमरसिंह यांना पराभवाचा धक्का देत पुन्हा आमदारकी मिळविली. बदामराव पंडित यांना 1 लाख 816 मते मिळाली होती. तर अमरसिंह पंडित यांना 98 हजार 469 मते मिळाली होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र होते. राज्यातील आणि जिल्ह्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा विचार करुन अमरसिंह पंडित यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हा परिषदेत चार सदस्यांचे मत राष्ट्रवादीला मिळाल्याने सत्ता कायम राहिली. त्यामुळे अजित पवार यांनीही अमरसिंह यांना विधान परिषद आमदारकीचे बक्षीस दिले. दोन कट्टर काका-पुतण्याला एका पक्षात ठेवण्याचा प्रयोग अजित पवार यांनी केला. पण दुसऱ्या बाजूला अमरसिंह यांच्या अजित पवार यांच्याशी वाढत्या जवळिकीमुळे बदामराव पंडित भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. पण दोन्ही पंडित राष्ट्रवादीत स्थिरावले. मग भाजपच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही पंडितांना पर्याय ठरेल, अशा नेतृत्वाचा शोध भाजप नेते घेत होते.

Ground Zero : आष्टीत धस, धोंडे अन् आजबेंनाही ‘जरांगे फॅक्टर’चा धसका!

भाजपचा हा शोध थांबला अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांच्यापर्यंत येऊन. माजी आमदार शाहुराव पवार यांचे नातू, माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव आणि गेवराईचे माजी नगराध्यक्ष अशी त्यांची ओळख होती. लक्ष्मण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मैदानही मारले. पंडित कुटुंबाच्या एकीला आणि वर्चस्वाला धक्का देत त्यांनी 60 हजार मतांनी विजय मिळवला. लक्ष्मण पवार यांना 1 लाख 36 हजार 384 मते तर बदामराव पंडित यांना 76, 383 मते मिळाली. पंडित घराण्याची राजकीय सद्दी संपवत तब्बल 34 वर्षानंतर घरात पुन्हा आमदारकी खेचून आणली.

2019 विधानसभेमध्ये मात्र काका-पुतणे पुन्हा रिंगणात उतरले. पण यावेळी अमरसिंह यांच्याऐवजी भाऊ विजयसिंह रिंगणात उतरले. तर भाजपने लक्ष्मण पवार यांना दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारी दिली होती. बदामराव पंडित यांनीही बंडखोरी केली. त्यामुळे तिरंगी लढत झाली. लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित या दोघांमध्ये फाइट झाली. पवार हे 99 हजार 625 मते घेऊन विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित हे 92 हजार 833 मते घेतली. अपक्ष रिंगणात उतरलेले बदामराव पंडित हे 50 हजार 894 मतेच घेऊ शकले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघात अजित पवार गटाच्या अमरसिंह पंडित आणि आमदार लक्ष्मण पवार या दोघांची ताकद असताना लोकसभेला पंकजा मुंडे यांना या मतदारसंघातून लीड मिळाली नाही. गेवराईत बजरंग सोनवणे तब्बल 39 हजारांनी पुढे राहिले. पंकजा मुंडेंना 95 हजार 409 मते होती. तर बजरंग सोनवणे यांना 1 लाख 34 हजार 505 मध्ये मिळाली होती. या आकड्यामुळे आता लक्ष्मण पवार यांचेही टेन्शन वाढले आहे. यातूनच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केल्याचे बोलले जाते.

आता विधानसभेसाठी या जागेवर महायुतीमध्ये तिढा आहे. कारण अजित पवार गटात अमरसिंह पंडित, त्यांचे बंधू विजयसिंह पंडित आहेत. तर भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून बदामराव पंडित हे इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून अण्णासाहेब राठोड, किसन सेलच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे हे इच्छुक आहेत. गेवराईत मराठा आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळाला. मनोज जरांगे यांना मारणारा मोठा वर्ग येथे आहे. त्यामुळे जरांगे यांच्याकडून गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे हे निवडणुकीची तयारी करत आहे. मध्यंतरी झालेल्या ओबीसी-मराठा संघर्षामुळे एखाद्या ओबीसी उमेदवारी रिंगणात उतरू शकतो. तसे आमदार लक्ष्मण पवार हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारात सक्रीय नव्हते. त्याचा फटका पवार यांना बसू शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक या मतदारसंघात चुरशीची होणार आहे.

follow us