Ambadas Danve : महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. सर्वच पक्ष एकविचाराने काम करत असल्याचा दावा आघाडीतील नेत्यांकडून केला जात असला तरी आता येथेही वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. आताही आघाडीतील दोन नेत्यांत धुसफूस वाढू लागली आहे. त्याला कारण ठरले आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेले खळबळजनक आरोप. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. वडेट्टीवार यांनी चक्क अंबादास दानवे यांच्याकडे बनावट ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप केला होता.
पैसे घेऊन 28 लाख लोकांना OBC प्रमाणपत्र; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ !
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना काल प्रसारमाध्यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला. त्यावर दानवे म्हणाले, वडेट्टीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे आहेत. असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नाही. त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करून सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी. जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल. तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन आरोप करावेत. मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे. मला त्याचा अभिमान आहे. मी कोणत्याही जातीचा नेता नाही. आतापर्यंत कोणत्याच आरक्षणाचा लाभ मी घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या प्रवर्गातून मी निवडून आलो आहे, असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले.
मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 28 लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. इतकेच नाही तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असूनन ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आणून दिले.
अंबादास दानवे मराठा आहेत. पण, त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देखील घेतली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी देण्यात आली. हे काम वेगाने सुरू आहे. एकीकडे आपल्याला झुंजवत ठेवलं आणि दुसरीकडे सरसकट प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता.