Download App

Ground Zero : अकोलेमध्ये पिचड-लहामटेंचे काय होणार? शरद पवारांनी शोधलाय तगडा पर्याय!

अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे विरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांच्यात लढत होणार

  • Written By: Last Updated:

2019 च्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होती. मोदी लाट ओसरली नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरु होते. या परिस्थितीही शरद पवार (Sharad Pawar) स्तब्ध होते, स्थितप्रज्ञ होते. पण पवार यांना धक्का बसला तो अकोलेच्या मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांच्या पक्षांतरचा. शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) संस्थापक सदस्य, प्रदेशाध्यक्ष, तब्बल 34 वर्षे अकोलेचे आमदार, तीनवेळचे कॅबिनेट मंत्री अशी त्यांची ओळख. यानंतरही त्यांनी पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या निवडणुकीत पवार यांनी वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांना पराभूत करत या गोष्टीचा वचपा काढला. 39 वर्षानंतर पिचड यांच्या घरातून आमदारकी वजा झाली. (Amit Bhangre of NCP Sharad Chandra Pawar’s party will fight against Kiran Lahamte of NCP in Akole Assembly Constituency.)

2019 मध्ये आमदार झालेले किरण लहामटे जायंट किलर म्हणून ओळखले गेले. पण वर्षभरापूर्वी लहामटे यांनीही पवारांची साथ सोडली. अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्ताधारी आघाडीत सामील झाले. पवार यांच्यासाठी हाही मोठा धक्का होता. मात्र ते डगमगलेले नाहीत. त्यांनी सलग दुसऱ्या निवडणुकीत एका नवीन चेहऱ्याला आमदार करण्याचे शिवधनुष्य उचललेले आहे. पवार यांनी देखील हे आव्हान पूर्ण करण्यासाठी एका तरुण शिलेदाराची निवड केली आहे. त्या शिलेदाराला ताकद देण्याचे आणि त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पवार यांनी थेट अकोलेमध्ये जाऊन केलेले आहे. नेमका कोण आहे हा शिलेदार आणि तो किरण लहामटे, वैभव पिचड यांना कसा जड जाऊ शकतो…

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

अकोले विधानसभा मतदारसंघातील सत्ताकेंद्र 2019 पर्यंत पिचड यांच्याकडेच होते. सर्वकाही व्यवस्थित होते, मतदारसंघातील सर्व संस्था ताब्यात होत्या. असे असतानाही पिचड पिता-पुत्र विधानसभेपूर्वी भाजपवासी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले भाजपचे डॉ. किरण लहामटे यांना शरद पवार, अजित पवार यांनी शोधले. नुसते शोधलेच नाही तर मताची फाटाफूट होऊन पिचडांना फायदा होऊ नये म्हणून अशोक भांगरे, मधुकर तळपाडे सारखे अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे राहू दिले नाहीत. त्यांची एकप्रकारे लहामटे यांना साथ मिळाली. पिचडांचे सर्व राजकीय विरोधक एकत्र आले होते. त्यातून पिचडांना तब्बल चाळीस वर्षात पहिला धक्का बसला. वैभव पिचड हे तब्बल 58 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले.

यानंतर पिचडांना एकामागून एक धक्के बसण्यास सुरुवात झाली. अगस्ती साखर कारखाना तब्बल 28 वर्षे पिचडांच्या ताब्यात होता. तो कारखाना आमदार लहामटे आणि पिचड यांचे एकेकाळचे सहकारी सीताराम गायकर यांना हिसकावून घेतला होता. पिचडांना झटका देण्यासाठी त्यावेळी स्वतः अजित पवार हे सभा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर पिचड यांना स्वतःची राजूर ग्रामपंचायत राखता आली नाही. तिथूनही जनतेतून राष्ट्रवादीचा सरपंच झाला. पण जास्त सदस्य पिचडांचे निवडून आले. त्यानंतर बाजार समितीही पिचडांचे हातातून गेली आहे. सध्या केवळ अमृतसागर दूध संघ आणि अकोले नगरपालिका पिचडांच्या ताब्यात आहे.

Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार किरण लहामटे हे अजित पवारांकडे जावे की शरद पवारांची साथ द्यावी या संभ्रमात होते. ते काही काळ शरद पवारांबरोबर होते. परंतु त्यानंतर ते अजित पवार गटाकडे गेले. महायुतीमध्ये हा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा असणार आहे. त्यामुळे लहामटे हे महायुतीचे उमेदवार असणार हे नक्की. महाविकास आघाडीमध्ये येथून शरद पवार गटाचे उमेदवार राहतील. पिचडांना कायम विरोध करत आलेले दिवंगत अशोक भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे हे विधानसभा उतरणार हे पक्के ठरले आहे. गेल्या महिन्यात अकोले येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे या मतदारसंघात किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होणार हे नक्की.

दिवंगत अशोक भांगरे यांनी अकोले मतदारंसघातून तब्बल सहा वेळा विधानसभा लढवली. त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याशी अनेकदा संघर्ष केला. ते भाजपमध्ये होते. परंतु पिचड भाजपमध्ये गेल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आले. त्यांची पत्नी सुनीता भांगरे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांचा मुलगा अमित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे पाहिले तर भांगरे कुटुंब हे गेल्या सत्तर वर्षांपासून राजकारणात आहेत. अमित यांचे पंजोबा गोपाळराव हे संगमनेर-अकोले मतदारसंघातून पहिले आमदार होते. त्यानंतर त्यांचे आजोबा यशवंतराव भांगरे तीन वेळा आमदार झाले. पण त्यांचे वडिल अशोक भांगरे यांचे आमदारकीची स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाहीत. आता मुलगा अमित भांगरे यांना आमदार होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग… शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?

त्याचवेळी कायम पिक्चरमध्ये असलेल्या पिचड पिता-पुत्रांची कोंडी झाली आहे. पण पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्याचा इरादा पिचड पिता-पुत्रांचा आहे. त्यामुळे वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील, असे स्थानिक पत्रकार सांगतात. असे झाल्यास अकोल्यामध्ये पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या गुप्त भेटी झाल्या आहेत. पवार एखाद्या वेळी पिचड-भांगरे यांची मोट बांधून अकोले तालुक्यात वेगळी गणिते मांडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात पिचड यांनी शरद पवार यांनीच आदिवासींचं स्वतंत्र बजेट देऊन न्याय दिल्याचे जाहीर केल्याने त्यांची युती होईल का ?असा कयास व्यक्त होत आहे.

follow us