Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव

  • Written By: Published:
Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव

राज्याच्या राजकारणात काही मतदारसंघ असे आहेत जिथे पिढ्या न् पिढ्या दोन घराण्यांमध्येच संघर्ष होतो. त्याच दोन कुटुंबांभोवती तालुक्याचे राजकारण फिरते, प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यामध्येच फाईट होते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ (Kopargaon Assembly Constituency) असाच आहे. कोपरगाव तालुका म्हणजे सहकाराची पंढरी. गोदावरीमुळे उसाचे अमाप पीक आहे. काळे आणि कोल्हे या परंपरागत राजकीय कुटुंबांचे साखर कारखाने आहेत. दोघेही एका अर्थाने सहकारातील धुरंदर आहेत. (Vivek Kolhe vs Ashutosh Kale is going to fight in Kopargaon Assembly Constituency.)

साखर निर्मितीसोबतच इथेनॉल आणि देशी दारूही निर्मिती होते. काळेंच्या सहकारी कारखान्याचा ‘भिंगरी’ आणि कोल्हेंच्या कारखान्याचा ‘बॉबी’ हा देशी दारूचा ब्रॅन्ड फेमस आहे. राजकारणात हे दोघे असेच तोडेस तोड आहेत. हे दोन्ही घराणेच पक्ष आहेत. आजपर्यंत आलटून-पालटून आमदारकी यांच्याकडेच राहिली आहे. तिसरा भिडू प्रयत्न करतो. परंतु त्यांचा टिकाव लागत नाही. यंदाही या मतदारसंघात याच दोन घराण्यात लढत होणार हे स्पष्ट आहे. पण यात बाजी कोण मारणार आणि कोणाचा धुरळा उडणार? पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

सहकारमहर्षी शंकरराव काळे (Shankar Rao Kale) आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (Shankar Rao Kolhe). 1960 च्या दशकात या दोघांनी राजकारणाची सुरुवात केली. हे दोघेही एकेकाळी काँग्रेसमध्ये (Congress) एकाच पक्षात होते. दोघेही शरद पवारांना मानणारे होते. शंकरराव कोल्हे यांचा एक अपवाद वगळला तर 1972 पासून 2004 पर्यंत असे तब्बल 35 वर्षे कोपरगावचे आमदार राहिले. तीनवेळा मंत्रिपद भुषविले. तर शंकरराव काळे हेही दोनवेळा पारनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार झाले होते. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले.

घुलेंचा आमदारकीचा चंग.. प्रतापराव, मोनिकाताई टेन्शनमध्ये

या दोन्ही कुटुंबांमध्ये खऱ्या अर्थाने पहिली ठिणगी पडली ती 1999 च्या निवडणुकीत. या निवडणुकीत दोन्ही कुटुंबे आमने-सामने आली. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीतून तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे हे काँग्रेसमधून रिंगणात उतरले. यात बाजी मारली ती शंकरराव कोल्हे यांनी. 2004 साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून दिले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने अशोक काळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत धनुष्य-बाण हाती घेतला.

2004 आणि 2009 या दोन्ही वेळी अशोक काळे यांनी बिपीन कोल्हे यांचा पराभव करत आमदारकी मिळविली. 2014 मध्ये अशोक काळे यांनी मुलगा आशुतोष काळे यांच लॉचिंग केले आणि शिवसेनेचे तिकीटही मिळवून दिले. तर कोल्हे यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत भाजपची वाट धरली. शिवाय बिपीन कोल्हे यांच्या ऐवजी पत्नी स्नेहलता यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा फायदाही झाला आणि कोल्हेंच्या घरात 10 वर्षांनी पुन्हा आमदारकी आली. स्नेहलता कोल्हे यांना 99 हजार 763 मते मिळाली. तर आशुतोष काळे यांना 70,493 मते मिळाली होती.

2019 मध्ये आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळविले. ती निवडणुकही अटीतटीची झाली. भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा काळे यांनी अवघ्या 822 मतांनी पराभव केला. त्यावेळी राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे हे अपक्ष रिंगणात उतरले होते. राजेश परजणे यांनी 15 हजार 446 मते घेतली होती. तर कोपरगावचे नगराध्यक्ष असताना भाजपचे विजय वहाडणे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. परंतु ते चार हजारच मते घेऊ शकले. राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये असूनही काळे यांना मदत केल्याची चर्चा होती. त्या पराभवाची सल कोल्हे कुटुंबाला आजही आहे.

Letsupp Ground Zero : सुनील केदार यांचे ग्राऊंड उद्ध्वस्त होणार? भाजपचे तीन प्लेअर तयार!

आता कोल्हे कुटुंबियांमध्ये नेतृत्व विवेक कोल्हे यांच्याकडे आले आहे. ते मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमकपणे राजकारण करत आहेत. विखेंचा बदला घेण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळीस खिंडीत गाठत आहेत. गणेश कारखान्याची निवडणूक हे याच बदल्याचे द्योतक होते. त्यांनी गणेश सहकारी साखर कारखाना विखे पिता-पुत्राच्या हातातून हिसकावून घेतला. नाशिक शिक्षक मतदारसंघातही विवेक अपक्ष रिंगणात उतरले होते. इथे त्यांनी दोन नंबरची मते घेतली होती.

आता आशुतोष काळे हे अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर कोल्हे भाजपमध्ये आहेत. या नव्या समीकरणांनी कोल्हेंची कोंडी झाली आहे. राजकीय वाद तीन पिढ्यांचा आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब हे विधानसभेला एकत्र राहूच शकत नाही. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाईल. तसे शरद पवारांकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे कोल्हे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, अशा चर्चा आहेत.

त्यामुळे तिसऱ्या पिढीतील संघर्ष घेऊन या विधानसभा निवडणुकीलाही कोल्हे आणि काळे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे हे कोल्हेंकडून झालेल्या राजकीय विरोधामुळे गप्प बसणार नाहीत. राधाकृष्ण विखे हे पुन्हा आपले मेहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य, महानंदचे माजी अध्यक्ष राजेश परजणे यांना मैदानात उतरून कोल्हेंचा हिशोब चुकता करण्याचे प्रयत्न करू शकतात. त्यामुळे 2024 ची निवडणूकही चुरशीची होणार हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube