घुलेंचा आमदारकीचा चंग.. प्रतापराव, मोनिकाताई टेन्शनमध्ये
दिवंतग गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) नेहमी एक वाक्य म्हणायचे… “परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे.” परळीनंतर मुंडे कुटुंबियांसाठी सर्वात जवळचा मतदारसंघ कुठला असेल तर तो शेवगाव-पाथर्डी. बीड आणि अहमदनगर सीमेवर असलेला हा मतदारसंघ मुंडे कुटुंबियांसाठी घरासारखा होता आणि आजही आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी अशी मागणी सातत्याने इथले भाजपचे (BJP) कार्यकर्ते करत राहिले.
पण पंकजा या आता विधानपरिषदेवर गेल्या आहेत. त्यामुळे इथल्या भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक प्रतापराव ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले अशा सर्वच इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण विरोधी पक्षातील नेते रिलॅक्ट झालेत असे म्हणता येणार नाही. कारण पंकजा लढणार नसल्या तरी त्यांचा शब्द या मतदारसंघात प्रमाण मानला जातो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही इथे चुरशीचा सामना होणार हे नक्की. त्यातच इच्छुकांची संख्या बघता तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता आहे. (In the Shevgaon-Pathardi assembly constituency, there will be a fight between BJP’s Monica Rajale and NCP Sharad Chandra Pawar’s Prataprao Dhakne)
याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या विधानसभा निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहू शेवगाव-पाथर्डीचे गणित कसे असणार?
2009 पर्यंत शेवगाव आणि पाथर्डी हे दोन्ही वेगळे मतदारसंघ होते. मात्र दोन्ही आघाडीच्याच ताब्यात होते. 2004 मधील निवडणुकीत शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले तर पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव राजळे विजयी झाले होते. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत दोन्ही तालुक्यांचा एकच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ अस्तित्वात आला. या पुनर्रचनेने मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले. घुले, राजळे, ढाकणे हे सगळेच एकमेकांसमोर उभे ठाकले. यात मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि नरेंद्र घुले यांचे बंधू चंद्रशेखर घुले यांना तिकीट मिळाले. परिणामी राजीव राजळे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 81 हजार मते घेत घुले पुन्हा आमदार झाले. तर 61 हजार मतांसह ढाकणे दोन नंबरला आणि 43 हजार मते घेत राजळे तिसऱ्या नंबरवर राहिले.
2014 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मोदी लाट कायम होती. शिवाय काही दिवस आधीच गोपीनाथ मुंडे यांचेही निधन झाले होते. त्यामुळे भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती ही समीकरणे ओळखून राजळे कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोनिका राजळेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. तर प्रतापराव ढाकणे राष्ट्रवादीत आले. पण राष्ट्रवादीने पुन्हा घुले यांनाच तिकीट दिले. त्यावेळी मोनिका राजळेंची समीकरणे फिट बसली आणि तब्बल एक लाख 34 हजार मते घेत त्या आमदार झाल्या. घुले यांचा 53 हजार मतांनी पराभव झाला.
Ground Zero : बबनरावांची माघार, मुलगा मैदानात… श्रीगोंद्यात विरोधकांना सुगीचे दिवस?
2019 च्या निवडणुकीपूर्वी ढाकणे यांनी आर-पारची भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप करत येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले, तर वेगळ्या मार्गाने निवडणुकीत उतरण्याचा इशारा प्रताप धाकाने यांनी दिला. राष्ट्रवादीनेही सबुरीची भूमिका घेत ढाकणेंना तिकीट दिले. त्यांनी मोनिका राजळे यांना तगडे फाईट दिली. पण ते विजयापर्यंत जाऊ शकले नाहीत. प्रताप ढाकणे यांना 98 हजारांहून अधिक मते मिळाली होती. तर मोनिका राजळे यांना 1 लाख 12 हजारांहून अधिक मते मिळाली होती.
लोकसभेलाही या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये सुजय विखे यांना इथून तब्बल 60 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा हे लीड साडेसात हजारांपर्यंत कमी झाले पण भाजपचेच वर्चस्व कायम राहिले. गत लोकसभेला विखेंसाठी शेवगाव-पाथर्डीचे मतदान बुस्टर ठरले होते. यंदा मात्र लंकेंनी इथून तगडी फाईट दिल्याने आणि निवडूनही आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला आहे. यंदा राजळेंचा आणि भाजपचा बालेकिल्ला खालसा होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स शरद पवार समर्थकांमध्ये आला आहे.
आता यंदाच्या विधानसभेला हा मतदारसंघ भाजपकडेच असणार हे तर उघड आहे. शिवाय मोनिका राजळे याच प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रताप ढाकणे यांचा दावा भक्कम आहे. पण चंद्रशेखर घुले यांनी या दोघांचेही टेन्शन वाढवले आहे. आमदारकी पुन्हा मिळविण्यासाठी घुले हे कामाला लागले आहेत. ते सध्या पाथर्डी आणि शेवगाव दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मोनिका राजळे यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते ते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहे. घुले हे सध्या अजित पवार यांच्याबरोबर आहेत. परंतु महायुतीमध्ये तिकीट मिळणे अवघड आहे. त्यामुळे ते अपक्ष निवडणुकीचा रिंगणात उतरू शकतात. 2019 च्या निवडणुकीत घुले आणि ढाकणे एकत्र होते. त्यांची ढाकणे यांनी मोठी मदत झाली होती.
ठाकरेंचा राग, पाटणकरांची ताकद… यंदा शंभुराज देसाईंचं काही खरं नाही….
या तिघांशिवाय शेवगावमधील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे याही अपक्ष म्हणून तयारी करत आहे. पाथर्डीचे पंचायत समितीचे माजी सभाजपी आणि भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड हे भाजपकडून इच्छुक आहे. त्यांनीही वेळ आली तर अपक्ष लढू, असे छातीठोकपणे सांगत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. किसन चव्हाण हे रिंगणात उतरलीत असे दिसते. घुले, राजळे, ढाकणे हे तिघेही साखरसम्राट आहेत. तर हर्षदा काकडे यांच्या शिक्षण संस्था आहे. मागील अनेक वर्षे त्यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसंपर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागून असल्याने इथे वंजारी समाज मोठ्या संख्येने आहेत. पाथर्डीमध्ये 50 हजारांहून अधिक आणि शेवगावमध्ये वीस हजाराच्या आसपास असा सुमारे 70 हजारांहून अधिक वंजारी समाजाचे मतदान आहे. इतर ओबीसी समाजाची संख्याही मोठी आहे. हा मतदार भाजपाचा हक्काचा व्होट बँक आहे. राजळे, घुले आणि काकडे हे तिघे मराठा उमेदवार आहे. तर ढाकणे ओबीसी उमेदवार असतील. त्यामुळे चौरंगी लढत झाली तर मतविभाजन होऊ शकते. मराठा-ओबीसी संघर्षात बीड लोकसभा मतदारसंघात पक्ष न बघता उमेदवार बघून मतदान झाले होते. त्यामुळे या मतदारसंघातही तसेच काही होईल का अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे. म्हणूनच हा मतदारसंघही संवेदनशील राहणार आहे हे नक्की.