ठाकरेंचा राग, पाटणकरांची ताकद… यंदा शंभुराज देसाईंचं काही खरं नाही….
शरद पवार यांना सर्वाधिक राग आहे तो छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) अशा सहकाऱ्यांचा. अगदी त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना राग आहे तो शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा पाटणच्या खोऱ्यात ना पक्ष चालतो, ना व्होट बँक चालते. इथे चालतात ते दोन गट. एक देसाई गट आणि दुसरा पाटणकर गट. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून तब्बल 33 वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले. ते राज्याचे गृहमंत्री झाले. याच बाळासाहेब देसाई यांच्या निधनानंतर देसाई गट अशक्त झाला होता. 1983 ची पोटनिवडणूक, 1985, 1990, 1995 अशा सलग चार निवडणुकीत देसाई गटाला पराभवाचा धक्का बसला होता. पाटणकर गटाने तालुक्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते.
अशात देसाई गटाला उभारी दिली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. निवडणूक प्रचाराशिवाय बाळासाहेब ठाकरे दौरे, प्रवास सहसा टाळायचे. त्यानंतरही, 1997 साली पाटणसारख्या ग्रामीण भागातील कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी स्विकारले. शंभूराज देसाई यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. याच कार्यक्रमात शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र राज्य सहकार परिषदचे अध्यक्षपद मिळाले आणि देसाई गटाचा लालदिवा पुन्हा तालुक्यात फिरू लागला. तिथून देसाईंनी मागे वळून बघितलेच नाही. 2004 मध्ये शंभूराज देसाई आमदार झाले. देसाई गटाने तब्बल 20 वर्षांनी गुलाल उधळला. (Uddhav Thackeray has given strength to Satyajit Patankar in Patan assembly constituency against Shambhuraj Desai.)
‘पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा…’, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचाही शंभूराज देसाई यांच्यावरचा लोभ कायम होता. शिवसेना विधिमंडळ गटाच्या चर्चा, रणनीतीमध्ये उद्धव ठाकरे देसाई यांना आग्रहाने सहभागी करुन घेत. विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समतोल राखताना ते दिसत होते. 2019 मधील आघाडी सरकारमध्ये शंभूराज मंत्री झाले. थोडक्यात जो स्नेह, जी ताकद पवारांनी भुजबळ, वळसे पाटलांना दिली, अगदी तीच ताकद ठाकरे यांनी देसाईंना दिली. त्यानंतरही त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याची रिस्क घेतली. तेव्हापासूनच ज्या काही आमदार आणि मंत्र्यांचा पराभव करण्याची ठाकरे यांची मनापासूनची इच्छा आहे त्यात शंभूराज यांचे नाव आहे, हे अगदी डोळे झाकून सांगू शकतो…
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या विशेष सिरीजमध्ये पाहू ठाकरेंच्या या प्रयत्नांना यश येण्याचे कितपत चान्सेस आहेत…
पाटणमध्ये 1951 ते 1983 असे 33 वर्षे बाळासाहेब देसाई आमदार होते. तिथून 2004 पर्यंत विक्रमसिंह पाटणकर यांनी नेतृत्व केले. 2004 साली शंभूराज देसाई आमदार झाले. मंत्री असणाऱ्या विक्रमसिंह पाटणकर यांचा पाच हजार 851 मतांनी पराभव झाला. 2009 साली चुरशीच्या लढतीत पुन्हा विक्रमसिंह पाटणकर यांनी अवघ्या 580 मतांनी बाजी मारली.
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांनी निवडणूक लढवली. यात शंभूराज 19 हजार मतांनी दणदणीत विजय झाले होते. त्यांना एक लाख चार हजार 95 मते तर सत्यजितसिंह यांना 85 हजार 144 मते मिळाली होती. आजवर पाटण मतदारसंघातील तो सर्वात मोठ्या मार्जिनचा विजय ठरला होता. 2019 मध्येही हेच चित्र कायम राहिले. देसाई यांचा 14 हजार मतांनी विजय झाला.
आता हे दोन्ही गट यंदाच्याही निवडणुकीत पुन्हा आमने-सामने येणार आहेत. पण यंदा समीकरणे काहीशी वेगळी आहेत. देसाई यांनी शिंदेसोबत जाण्याची भूमिका घेतली. पण ते राज्य उत्पादन शुल्कसारख्या जबाबदार खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. त्यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात ताकद बाळगून आहेत. जिल्हा नियोजन समितीचा सगळा निधी त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे पाटण तालुक्याला ते सढळ हाताने निधी वाटताना दिसतात.
इंदापूरची जागा अपक्ष लढा, कार्यकर्त्यांची मागणी; हर्षवर्धन पाटलांच्या मनात काय?
गावांतील पुढाऱ्यांना बोलावून “किती निधी पाहिजे” अशी विचारणा करत यादीच सादर करायला सांगतात. त्यानुसार तरतूदही करतात. त्यातून त्यांचा स्थानिक नेत्यांशी आणि लोकांशी संपर्क टिकून आहे. गत पाच वर्षांमध्ये देसाई यांनी बाजार समितीवरची पाटणकर गटाची 40 वर्षांची सत्ता खालसा केली. पंचायत समितीमध्ये सभापती बसवले. शेकडो ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. अनेकजण आजही देसाई गटात जाहीर प्रवेश करताना दिसतात. थोडक्यात पाटणकरांचा गट उबदारी येणार नाही याची पुरेपुर काळजी शंभुराज यांनी घेतली.
पण मांजरीला कोपऱ्यात दाबणे जास्त दिवस शक्य नसते, त्याप्रमाणे पाटणकरांनी उसळी मारली. आधी पाटणची नगरपालिका मारली. मग जिल्हा बँकेला देसाईंचा पराभव केला. सकस दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला हातभार लावला. महाविद्यालय, नवीन येऊ घातलेल्या शुगर केन प्रकल्पातून आर्थिक चक्र फिरती ठेवली. सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पाटणकर गटाने अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पाटणकर यांनी यंदाच्या लोकसभेलाही मजबूत काम केले. त्यामुळे पाटण मतदारसंघातील महायुतीची आघाडी अवघ्या तीन हजार मतांवर आली आहे.
श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण या ज्येष्ठ नेत्यांनाही मानणारा तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. आता सत्यजीत पाटणकर यांच्या मदतीला ठाकरे गटही आहे. देसाई यांच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांच्या नाराजीला हर्षद कदम यांच्यारुपाने चेहरा मिळाला आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे या मतदारसंघाकडे लक्ष ठेऊन आहेत. पण जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवार घेतील असेच दिसते. या परिस्थितीमध्ये कदम यांनी पाटणकरांना मदत केल्यास त्यांच्याही राजकीय भविष्याला चालना मिळू शकते, असे स्थानिक पत्रकार सांगतात.
एका बाजूला या राजकीय घडामोडी घडत आहेत. पण या राजकारणात,आव्हान-प्रतिआव्हानात तालुक्यातील सामान्य जनतेच्या पदरात नक्की काय पडले हे उत्तर कोणताही नेता, पदाधिकारी अगदी मतदारही देऊ शकत नाही. या तालुक्यात अद्यापही बहुतांशी समस्या कायम आहेत. मतदारसंघात तरुणांच्या हाताला रोजगार देऊ शकेल असा मोठा प्रकल्प नाही. परिणामी तालुक्यातील तरुणांना कोल्हापूर, पुणे, मुंबईशिवाय पर्याय नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा तालुका अशी पाटणची ओळख आहे. पण मुख्य रस्त्याची अवस्था बिकट आहे. पाटण शहरापासून 20 किलोमिटरवर कोयना आहे. पण तिथे पोहोचायलाही एक तास लागतो.
ज्या कोयना धरणामुळे राज्यासह शेजारच्या राज्यांनाही पाणी मिळते, निम्म्याहून अधिक राज्याला वीज मिळते ते धरण असूनही तालुक्यातील अनेक गावे पाणी आणि विजेपासून वंचित आहेत. खोऱ्यातील अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक आरोग्य केंद्राची धडपड सुरु आहे. कोयना बोटिंग बंद पडले आहे. मल्हारपेठला कोट्यावधी खर्चून पोलीस स्थानक बांधले पण मनुष्यबळाचा आभाव आहे. पर्यटन विकासाचे प्रकल्पही जावळी तालुक्यात गेले आहेत. कोयना अभयारण्याच्या माध्यमातून पर्यटनाचे आजही स्वप्नच आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
त्यामुळेच स्थानिक नेत्यांनी येणार्या काळात राजकीय संघर्ष जरूर करावा पण जनतेचे होणारे हालही लक्षात घ्यावेत, अशीही भावना या मतदारसंघातील नागरिक व्यक्त करतात…